
कवी अजय कांडर यांचे विधान
सावंतवाडी : सत्ताधारी आणि साहित्यिकांची युती ही निकोप समाजासाठी धोकादायक असून आजच्या धार्मिक उन्मादी राजकारणाला साहित्यिकांचेही प्रोत्साहन मिळत आहे. अशा काळात व्यवस्थेला शरण न जाणारा लेखकच सकस साहित्य निर्माण करू शकतो, असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी केले. सिंधुदुर्गचे सुपुत्र नाटककार कवी सिद्धार्थ विष्णू तांबे यांच्या स्मरणार्थ आयोजित पहिल्या ‘आंबेडकर चौक साहित्य संमेलना’चे ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.
सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ कवी वीरधवल परब, प्रा. एस. एन. पाटील यांची आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात कवी कांडर म्हणाले, साहित्यिकांनी फक्त लिहून वेगळे न राहता, सामाजिक समतेसाठी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. लेखकाने इतिहासाकडे एककल्ली न पाहता, सामाजिक समतेचे हत्यार म्हणून पाहिले पाहिजे. सिद्धार्थ तांबे यांचे लेखन याच समतेचा आग्रह धरणारे होते. म्हणून, हे संमेलन सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. दरम्यान, वीरधवल परब यांनी सिद्धार्थ तांबे यांच्या साहित्यातील सामाजिक वेदना आणि त्यांच्या चळवळीतील योगदानावर प्रकाश टाकला. उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांनी पालिका प्रशासनाच्यावतीने अशा सांस्कृतिक उपक्रमांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. तसेच साहित्य चळवळ पुढे नेली पाहिजे यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मधुकर मातोंडकर व विठ्ठल कदम साहित्य संस्कृती जोपासण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांना 'नाटककार सिद्धार्थ विष्णू तांबे लेखन' तर अनिल जाधव यांना 'कार्यकर्ता पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. तसेच कवी हरिचंद्र भिसे यांच्या 'रानपुराण' आणि समीर वेंगुर्लेकर यांच्या 'वारसदार' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कवी अरुण नाईक यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन पार पडले. नाटककार कवी सिध्दार्थ विष्णू तांबे स्मृती पहिले आंबेडकर चौक साहित्य संमेलन सावंतवाडी २०२६ चे उद्घाटन झाडाला पाणी घालून उपनगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी संमेलन अध्यक्ष कवी अजय कांडर, प्रमुख पाहुणे जेष्ठ कवी विरधवल परब, सांस्कृतिक व सामाजिक कार्यकर्ते प्रा. एस एन पाटील, जेष्ठ कवी अरुण नाईक, जेष्ठ कवयित्री संध्या तांबे, अनिल जाधव, संमेलन प्रमुख मधुकर मातोंडकर, कवी विठ्ठल कदम आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मधुकर मातोंडकर तर सूत्रसंचालन, आभार विठ्ठल कदम यांनी मानले. यावेळी लेखिका वृंदा कांबळी, अभिनेता नंदू पाटील, श्रीराम वाचन मंदिर कार्याध्यक्ष रमेश बोंद्रे, गोविंद काजरेकर,सावंतवाडी शाखा कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्ष दीपक पटेकर, डॉ विजयालक्ष्मी चिंडक, प्रा अरूण पणदूरकर,रवी जाधव, प्रज्ञा मातोंडकर, महेश परूळेकर, स्नेहा फणसळकर आदीं मान्यवर उपस्थित होते.










