...तर मनसे खळखट्याक करेल : अमित इब्रामपूरकर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 15, 2023 18:16 PM
views 318  views

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील कामगारांनी स्थानिक जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर व्यवसायात शिरकाव करून कमी दरात सेवा सुरु केल्याने स्थानिक जेसीबी ट्रॅक्टर व डंपर व्यवसायिकांच्या व्यवसायास फटका बसत असल्याबाबत मालवणातील स्थानिक व्यवसायिकांनी या विरोधात आवाज उठवत संबंधित परजिल्ह्यातील व्यवसायिकांना मज्जाव केला होता. एकीकडे भाजप जिल्ह्यातील उत्तरभारतीयांची संघटना बांधत आहे तर दुसरीकडे मालवणात भाजपमधील 'पुढारी' परप्रांतीयांच्या व्यवसायांना छुपा पाठिंबा देत आहे. जर भाजप स्थानिक व्यावसायिकांच्या विरोधात पक्षीय राजकारण करत परप्रांतीयांना पाठिंबा देणार असेल तर मनसेची भूमिका स्थानिक व्यावसायिकांच्या बाजूने खळखट्याकची असेल असे परखड मत मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी मांडले आहे.


अमित इब्रामपूरकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, जनतेने सत्तेत असलेल्या भाजपचा खरा चेहरा ओळखावा. राज ठाकरे यांनी सातत्याने परप्रांतीयबद्दलची मनसेची भूमिका मांडली आहे. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उत्तरभारतीयांच्या संघटनेबद्दल बोलताना भविष्यात सिंधुदुर्गातील सरपंच परप्रांतीय असण्याची भीती व्यक्त केली होती. भाजपकडून परप्रांतीयांची संघटना स्थापन करून जिल्हावासीयांना दिवाळी भेट दिली का ? असा प्रश्न उपस्थित केला होता.


आज मालवणात जे डंपरवर हमाल होते ते आता डंपर मालक झाले, काहींनी जेसीबी मशीन घेतली. स्थानिक व्यवसायिकांपेक्षा कमी दर लावून आपल्या मशीनरी मालवणात भाड्याने देत आहेत. जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर आपल्या राज्यातून अल्पव्याजदराने कर्जावर आणत आहेत. हा प्रकार  रोखण्याची ही आत्ताच वेळ आहे. अन्यथा हे लोक जमिनी घेतील घरे बांधतील आणि शेठ होतील. परराज्यातील गुन्हेगारी सुद्धा मालवणात येईल आणि वाढेल. स्थानिक व्यावसायिक मात्र उपरे होतील. वेळ निघून जाण्याअगोदर स्थानिकांनी अजून संघटित होऊन परप्रांतीय व्यवसायिकांना शहरातून हुसकावून लावणे आवश्यक आहे. त्यासाठी गरज पडल्यास मनसे खळखट्याक करेल.


मालवण शहरातील अनेक तरुण मोठ्या मेहनतीने कर्ज घेऊन वाळू, डंपर, ट्रॅक्टर, जेसीबी यांचा व्यवसाय करत आहेत. यात वाळू व्यवसायात शासन हस्तक्षेप करत आहे. पंधरा वर्षांपूर्वी अनेक तरुण वाळू व्यवसायात उतरले होते तशी वाळू व्यवसायाची परिस्थिती सध्या नाही. डंपर ट्रॅक्टर आणि जेसीबीवर स्थानिकांचा रोजगार अवलंबून आहे. मालवणात होणारे बांधकाम हे मोठ्या शहराप्रमाणे विस्तीर्ण नसून तालुक्यातील काही छोट्या भागामध्येच बांधकामे होतात आणि या व्यवसायात परप्रांतीय व्यावसायिक उतरल्यास त्याचा फटका स्थानिक व्यवसायिकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालवणातील अशा परप्रांतीय व्यवसायिकांनी आपापले जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर घेऊन आपले गाव गाठावे या स्थानिक व्यावसायिकांच्या संघटनेच्या भूमिकेला मनसेचा पाठिंबा असल्याचेही मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.