
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा ही सोन्याची खाण आहे. केवळ धबधब्यामुळे नाही तर जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे आहेत. या सर्व पर्यटन स्थळांना भेट देता यावी, पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहता यावे यासाठी आंबोली वर्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास पर्यटकांनी दिलेला भरघोस प्रतिसाद प्रेरणादायी आहे. वर्षा महोत्सवाच्या माध्यमातून आंबोली जगाच्या नकाशावर झळकेल असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. महोत्सवाचे उद्घाटन मंत्री केसरकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पर्यटन संचालनालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या सहकार्याने 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीत "आंबोली वर्षा महोत्सव 2023" चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव आंबोली ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे. याचा शुभारंभ शनिवारी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आंबोलीच्या माहितीपटाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच पर्यटन पुस्तिकेच प्रकाशन करण्यात आल.
याप्रसंगी अध्यक्ष मनोगतात मंत्री दीपक केसरकर म्हणाले, आंबोली हे केवळ पर्यटनस्थळ नसून जैवविविधता संपन्न गाव आहे. त्यामुळे आंबोलीच नव्हे तर अखंड सिंधुदुर्ग जिल्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरावा म्हणून शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. आंबोलीसह सावडाव, नापणे धबधब्यांवर बारमाही पर्यटन राहावे यासाठी पुढील काळात नियोजन करण्यात येणार आहे. वर्षा महोत्सवाच्या माध्यमातून आंबोली जगाच्या नकाशावर झळकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले , पर्यटनासह ॲडव्हेंचर स्पोर्टला महत्व देण्यात आले आहे. जंगल सफारी पॅराग्लाइडिंग, पेरा शूटिंग अशा विविध प्रकारच्या माध्यमातून या ठिकाणी देशासह विदेशी पर्यटक आकर्षित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. बंजी जंपींग, गोल्फ कोर सारखे प्रकार या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आहे.येणाऱ्या काळात जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांचा विकास व्हावा या दृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी आवश्यक असलेला कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून देऊ, तर या ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, पर्यटनाला चालना मिळावी यासाठी येथील स्थानिक लोकांना घेऊन विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे. पर्यटन स्थळाच्या ठिकाणी असलेल्या टेम्पररी स्टॉल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी आठ दिवसात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. तर जिल्ह्यातील वेंगुर्ले-मोचेमाड येथे होणाऱ्या पहिल्या पंचतारांकित हॉटेलचा प्रश्न येत्या दोन महिन्यात सुटेल. पाण्याची समस्या दूर करून तात्काळ हे हॉटेल सुरू करण्यात येईल. दरम्यान पारगड, हनुमंतगड ते दोडामार्ग हा भाग थेट गोव्यासह चौकुळला सर्किट रस्त्याने जोडला जाणार आहे.
याप्रसंगी माजी आमदार राजन तेली, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर, उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, ग्रामविकास अधिकारी संदीप गोसावी, पर्यटन महामंडळाचे हनुमंत हेडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, सिंधुदुर्ग पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, आंबोली माजी सरपंच शशिकांत गावडे, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, संतोष पालेकर, अमित कामत, रूपेश पाटील आदी उपस्थित होते.
प्रतिस्पर्धी तेलींचा केसरकरांनी पकडला हात
यावेळी उपस्थित माजी आमदार राजन तेली यांनी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांसह दीपक केसरकर यांना उद्देशून बोलत असताना सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर होऊन २५ वर्ष होऊन देखील म्हणाव तसा पर्यटन विकास झालेला नाही. पर्यटन प्रकल्प जिल्ह्यात आणून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे, पंचतारांकित हॉटेल प्रत्यक्षात यावी, कबुलायतदार गांवकर प्रश्नासाठी वनविभागान सहकार्य केल्यास बरेच प्रश्न मार्गी लागतील अस विधानं केल. याला उत्तर देताना केसरकर म्हणाले, विकास होण्यासाठी राजकीय पादत्राणं बाजूला सारून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. तेली यांनी पंचतारांकित हॉटेलचा मांडलेला मुद्दा योग्य आहे. हा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच जिल्ह्यातील पहिल फाईव्हस्टार हॉटेल साकार होईल असं केसरकर म्हणाले. दरम्यान, या महोत्सवातील बचत गटांच्या स्टॉलचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेजारी उभ्या असलेल्या राजन तेलींचा हात पकडत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी फीत कापून शुभारंभ केला. मतदारसंघातील प्रतिस्पर्धी असणारे हे दोन्ही सत्ताधारी नेते या निमित्ताने एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. याप्रसंगी दोघांत काही बातचीत देखील होताना पहायला मिळाली.