पर्यटन वृध्दीसाठी आंबोली वर्षा पर्यटन महोत्सव म्हणजे पहिले पाऊल : जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी

Edited by: विनायक गावस
Published on: August 13, 2023 13:42 PM
views 143  views

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत आंबोली येथील ग्रामसचिवालयात ‘आंबोली वर्षा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. हा महोत्सव 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान सुरू असणार आहे. यावेळी आंबोली पर्यटन माहिती पुस्तिका 2023 चे प्रकाशन व संकेतस्थळाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, आंबोली येथील वर्षा पर्यटन महोत्सवाचे आपण ब्रँडीग करणे आवश्यक आहे. तरच जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आंबोली प्रसिध्द होईल. पर्यटन वृध्दीमध्ये हा महोत्सव म्हणजे पहिले पाऊल आहे, यापुढे आपल्याला अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबवायचे आहेत. अशा उपक्रमामध्ये स्थानिकांचा सहभाग महत्वाचा असतो. वनअमृत प्रकल्पाच्या माध्यमातून देखील अनेक उपक्रम राबविले जात आहेत. आंबोली येथे वन उद्यान व फुलपाखरु उद्यानाचे नुतनीकरण तसेच धबधब्याच्या ठिकाणी स्वच्छतागृह स्थापन करण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच जंगल सफारीसाठी सायकल खरेदी करणे व निसर्ग मार्गदर्शक गाईडसाठी सिंधुरत्न योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला असल्याचेही त्या म्हणाल्या.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत, अशोक दळवी, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, सिंधुदुर्ग पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर,  शशिकांत गावडे, उप वनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे, प्रांताधिकारी सुशांत पानवेकर, तहसिलदार श्रीधर पाटील, लेखाधिकारी सुभाष गोसावी आदी उपस्थित होते.