
वैभववाडी : वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालय व गोदामाकरिता शासकीय भुखंडापैकी ५ गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा संघाचे उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी निवेदन दिले आहे.
तालुका खरेदी विक्री संघाच्या स्वतंत्र इमाईतीचा विषय बरेच दिवस रेंगाळला होता. संघाच्या स्वतःच्या मालकीची इमारत व गोदाम असावे याकरिता संचालक मंडळाचे प्रयत्न गेले तीन चार वर्षे सुरू आहेत. याच संदर्भात संघाचे उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी शुक्रवारी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली. संघाच्या इमारतीकारिता जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खरेदी विक्री संघ गेली ३६ वर्षे तालुक्यात कार्यरत आहे. या संघाच्या मार्फत शेतकऱ्यांना खते, पशुपक्षी खाद्य, शेती अवजारे विक्री, भात खरेदी केली जाते. मात्र, संघाची स्वतंत्र जागा नसल्याने कमी जागेत या सेवा द्याव्या लागत आहे. माल साठवणूकीसाठी स्वतः च्या मालकीची जागा नाही. तरी तहसील कार्यालयानजीक असणारी सर्व्हे नं ४०/ब/३/१ पैकी ५ गुंठे जागा संघासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रावराणे यांनी केले. मंत्री चव्हाण यांना निवेदन देताना त्यांच्यासोबत माजी जि.प.सदस्य सुधीर नकाशे उपस्थित होते.