
बांदा : निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी १५ वित्त आयोगातील ग्रामपंचायत स्तर मधून इमारत रंगकाम करणे निगुडे गावठणवाडी अंगणवाडी येथील कामासंदर्भात जी रक्कम अदा केली ती संबंधित काम करणारे ठेकेदाराला अदा न करता अन्य ठिकाणी आपली डी. एस. सी. वापरून पी. एफ. एम. एस. खात्यात रक्कम जमा करून गैरव्यवहार केला असा आरोप गुरुदास गवंडे यांनी केलाय.
यासंदर्भात गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी वासुदेव नाईक यांना गुरुदास गवंडे यांनी पत्रव्यवहार केला. दरम्यान, सरपंच निगुडे यांनी आर्थिक गैरव्यवहार केलेला असा आरोप करत या आर्थिक गैरवराची खातेनिहाय चौकशी करून संबंधित सरपंच यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता यांच्या अंतर्गत ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९ प्रमाणे कारवाई करण्यात यावी व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गुरुदास गवंडे यांनी केली आहे.
दरम्यान, याकरिता दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक १०:०० वा पंचायत समिती, सावंतवाडी या ठिकाणी उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिलाय. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग व पोलीस निरीक्षक सावंतवाडी, बांदा यांना पत्र व्यवहार केलेला आहे.