मालवण समुद्र किनारपट्टी भागातील सर्व विद्युत वाहिन्या होणार भूमिगत

निविदा प्रक्रिया पूर्ण | लवकरच प्रत्यक्षात कामे होणार सुरू | राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्पा अंतर्गत ६७ कोटी २५ लाख रु निधी मंजूर
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 22, 2024 06:24 AM
views 246  views

कणकवली : निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळात मालवण किनारपट्टी भागात विद्युत वाहिन्या, विद्युत खांब तुटून वीज वितरण विभागाचे मोठे नुकसान झाले होते. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पाहणी करून किनारपट्टी भागातील  वीज वाहिन्या भूमिगत करण्याचा निर्णय घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्पा ( NCRMP ) अंतर्गत महावितरणच्या  मालवण आणि कुडाळ डिव्हिजनसाठी एकूण  ६७ कोटी २५ लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे. भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.  मालवण समुद्र किनारपट्टी पासून २ किलोमीटर अंतरारील सर्व गावांमधील एलटी, एचटी व इतर विद्युत वाहिन्या भूमिगत होणार आहेत. त्याचबरोबर कुडाळ मालवण तालुके जोडणारी ३३ केव्ही लाईन देखील भूमिगत होणार आहे.  लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामध्ये आचरा सब डिव्हिजनसाठी २० कोटी ४६ लाख, मालवण सब डिव्हिजन साठी २४ कोटी ३३ लाख रु. आणि कुडाळ सब डिव्हिजन साठी २२ कोटी ४६ लाख रु. मंजूर करण्यात आले आहेत. या कामांसाठी माजी खासदार विनायक राऊत व तत्कालीन पालकमंत्र्यांनी आणि आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा केला होता. दोन दिवसांपूर्वी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, उपकार्यकारी अभियंता केतन पवार यांच्या समवेत बैठक घेऊन हि कामे लवकरात लवकर सुरु करण्याच्या सूचना दिल्या.