
कणकवली : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांचे पथकाने कसाल ओव्हर ब्रिजच्या खाली येथे अवैध गोवा बनावट दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत पाच लाख 52 हजार रुपयांची दारू आणि सुमारे अकरा लाख रुपये किमतीची दोन वाहने यासह दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांच्या नियंत्रणामध्ये एल सी बी ची विविध पथके तैनात करून आवश्यक तो सापळा रचून सदर कारवाई करण्यात आली.
दरम्यान पोलीस मागावर असल्याचा संशय आल्याने त्यांना चकवा देण्यासाठी कसाल ब्रिज वरून न जाता दोन्ही गाड्या कसाल सर्विस रोडने रत्नागिरीकडे निघाल्या होत्या . मात्र सापळा लावलेल्या पोलिसांनी असे काही होणार असा अंदाज असल्याने दोन्ही गाड्यांचा पाठलाग करत या गाड्या कसाल ब्रिज खाली अडवल्या.
तपासणी दरम्यान झायलो गाडीत गोवा बनावटीची अवैध दारू असल्याचे आढळून आले. तर बलेनो चालक हा या दारूचा मालक व झायलो कारला पायलटिंग करत असल्याचे निष्पन्न झाले . त्यामुळे दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली झायलो गाडी क्रमांक MH 07 Q 3453 आणि पायलटींग करणारी
बलेनो क्रमांक MH 07- AS-0146 या दोन्ही गाड्या व गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी आरोपी महेश धोंडी हुले, 32 रा. नेरुर करयाद नारुर, दुकानवाड, तालुका कुडाळ आणि विजय रमाकांत माने, 39 रा. नेरूर देऊळवाडा, तालुका कुडाळ या दोघांना ताब्यात घेण्यात आले. 13 सप्टेंबरला सायंकाळी 18.30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याबाबतचा गुन्हा सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर हे करत आहेत.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, उपनिरीक्षक रामचंद्र शेळके , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, हवालदार प्रमोद काळसेकर, अनुपकुमार खंडे , राजेंद्र जामसंडेकर, बस्त्याव डिसोजा, आशिष गंगावणे , प्रकाश कदम, पोलीस नाईक चंद्रकांत पालकर, आशिष जामदार, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती सावंत, सिया गवस, कॉन्स्टेबल चंद्रहास नार्वेकर, यशवंत आरमारकर यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.