
सिंधुदुर्गनगरी : नैसर्गिक प्रतिभेबरोबरच निरीक्षण, सराव आणि सातत्य ठेवल्यास कोणतीही कला साध्य करता येते, अशा शब्दात युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी कलेचे इंगित ओरोस येथे 'आम्ही साहित्यप्रेमी'च्या कार्यक्रमात उघड केले. यावेळी मेस्त्री यांनी चित्रकलेचे प्रात्यक्षिक दाखवताना विठ्ठलाचे चित्र अवघ्या पाऊण तासात काढून सादर केले.
ओरोस येथील 'घुंगुरकाठी'प्रणित 'आम्ही साहित्यप्रेमी' व्यासपीठातर्फे आयोजित ' गप्पा आणि कलाविष्कार' कार्यंकमात ते बोलत होते. 'आम्ही साहित्यप्रेमी'चे समन्वयक सतीश लळीत यांनी मेस्त्री यांची मुलाखत घेतली. श्री. मेस्त्री यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन श्री. लळीत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सुमारे तासाभराच्या प्रश्नोत्तरांमध्ये श्री. मेस्त्री यांनी त्यांचा आतापर्यंतचा कला क्षेत्रातील प्रवास उलगडून दाखवला. मुलाखतीनंतर चित्रकलेचे प्रात्यक्षिक दाखवताना त्यांनी वृत्तपत्राच्या पानावर श्री विठ्ठलाचे रंगीत चित्र अवघ्या पाऊण तासात काढून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला.
मेस्त्री म्हणाले की, मी देवगड तालुक्यातील गवाणेसारख्या अगदी छोट्याशा खेड्यात वाढलो. माध्यमिक शिक्षणानंतर आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोल्हापूरला गेलो. मात्र तिथे गेल्यावर 'कलानिकेतन' या संस्थेमध्ये एक कलाशिक्षक भेटले आणि त्यांनी चित्रकला अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. त्याआधी मी चित्रकलेच्या परीक्षा शाळेत असताना दिल्या होत्या. परंतु, उच्च शिक्षण घेण्यासारखी आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे व्यावहारिक उपयोगाचे शिक्षण घेण्याच्या हेतुने कोल्हापुरात गेलेला मी कलाशिक्षणासाठी प्रवेश घेतला. या प्रसंगाने माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. नंतर मी कला शिक्षक पदविकाही घेतली. कलाशिक्षण पूर्ण करुन मी गवाणेला गावी परतलो. पुढे काय करायचे, हे नजरेसमोर नव्हते. घरी किंवा गावात कलेची पार्श्वभूमी नव्हतीच. अशा स्थितीत परिसरातील माध्यमिक शाळांमध्ये स्वखर्चाने जाऊन विनामोबदला विद्यार्थ्यांना शिकवु लागलो.
असे करताना विद्यार्थ्यांना चित्रकलेची गोडी लावण्याबरोबरच स्वत:ची कला पुढे नेण्याचाही उद्देश होता,असे सांगुन श्री. मेस्त्री म्हणाले की, अध्यापन आणि सराव करीत मी स्वत:तील चित्रकार घडवित गेलो. यातून माझ्या असे लक्षात आले की, थोडीशी नैसर्गिक प्रतिभा असेल तर निरीक्षण, सराव आणि सातत्य ठेवले तर आपण उत्तम कलाकार होऊ शकतो. श्री. मेस्त्री यांनी यावेळी आपल्या जीवनप्रवासातील अनेक किस्से सांगितले. पांढऱ्या तिळावर, शिवराईवर, पिसावर चितारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूक्ष्म चित्रांपासुन ते दोन एकर तिळाच्या शेतावरील छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रांबद्दल, तसेच गवाणे येथे सुरु केलेल्या आर्ट स्टुडिओबद्दलही माहिती त्यांनी दिली.
मेस्त्री यांचा एक अनोखा पैलुही त्यांच्या मुलाखतीतून उलगडला. सातत्याने प्रवास करणाऱ्या मेस्त्री यांना रस्त्यावर वाहनांच्य धडकेत जखमी झालेल्या किंवा मरण पावलेल्या पशुपक्ष्यांबद्दल अतिशय कणव आहे. पक्षी किंवा प्राणी जर जखमी असेल तर ते त्याच्यावर उपचार करुन त्याला बरा करुन पुन्हा निसर्गात सोडतात. जर तो पशुपक्षी मरण पावला असेल तर त्याला रस्त्यावर न सोडता खड्डा करुन त्याला मूठमाती दिली जाते. त्यांनी अशा प्रकारे तीन हजार पशुपक्षी बरे केले आहेत, तर जवळपास तेवढ्याच पशुपक्ष्यांना मूठमाती दिली आहे. याबाबतीत आपले जमेल तसे अनुकरण करावे, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
प्रास्ताविकानंतर सतीश लळीत यांनी श्री. मेस्त्री यांचा परिचय करुन दिला. डॉ. सई लळीत यांनी त्यांना भेटवस्तु दिली. लेखक पुरुषोत्तम लाडू कदम यांनी आभार मानले. यावेळी गवाणे येथील श्रुती सुतार, हर्षद तोरस्कर, विनय वाडेकर, आदित्य वाडेकर राज वाडेकर हे विद्यार्थी चित्रकार उपस्थित होते.