
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असल्याने या ठिकाणी पोस्ट खात्यात असलेली तिकीट बुकिंग सुविधा सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर उपलब्ध करून देण्यात यावी या प्रमुख मागणीसह स्टेशनवरील समस्यांकडे कोकण रेल्वे प्रवासी समन्वय समितीने जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मधुकर मातोंडकर, शैलेश अंबाडेकर, विजय सामंत, वीज इंजिनियर चिन्मय अंधारी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात आले असून त्यांनी रविवारी खारेपाटण ते कणकवली रेल्वेस्टेशन परिसराची पाहणी केली. त्यानंतर ते आज सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनच्या पाहणीसाठी आले होते. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय समिती सिंधुदुर्गच्यावतीने या अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असल्याने या ठिकाणी तिकीट बुकिंग सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी ही सुविधा नसून ती पोस्ट कार्यालयात आहे. परंतु तेथील ही सुविधा अनेकवेळ बंद असते परिणामी नागरिकांना तिकीट मिळत नाही. त्यामुळे पोस्ट कार्यालयात असलेली तिकीट बुकिंग सुविधा सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच स्टेशन परिसरी झाडी झुडपे वाढली आहेत. पाण्याची गळती सुरू असून पाणी वाया जात आहे. प्रवाशांना बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. प्लॅटफॉर्म वर प्रवाशांना उभे राहण्यासाठी छत उभारण्यात यावे, शौचालयांची स्वच्छता करण्यात यावी यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर सचिव अजय मयेकर नागेश ओरोसकर स्वप्नील गावडे त्यांच्यासह संघटनेचे पदाधिकारीरिक्षा युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.