भित्‍तीचित्र स्पर्धेत अक्षय जाधव तर वेशभूषा स्पर्धेत रघुवीर काणेकर प्रथम

Edited by: दिपेश परब
Published on: August 16, 2024 13:29 PM
views 89  views

वेंगुर्ला : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या क्रॉफर्ड मार्केट इमारतीवर वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ‘’तिरंगा ट्रीब्‍युट’’  या उपक्रमाअंतर्गत विविध कार्य्रकम घेण्‍यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्‍यवरांचे हस्‍ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळयास पुष्‍पहार अर्पण करुन करण्‍यात आले. त्यानंतर वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत आयोजित करण्‍यात आलेल्‍या भिंत्‍तीचित्र महोत्‍सव २०२४ व ‘’घरोघरी तिरंगा’’ या उपक्रमाअंतर्गत राबविलेल्‍या वेशभूषा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. भित्‍तीचित्र महोत्‍सव २०२४ स्पर्धेमध्‍ये श्री. अक्षय जाधव याने प्रथम, गोविंद उर्फ  आत्‍माराम सावंत याने द्वितीय, आदित्य अनंत गावडे ग्रुप यांनी तृतीय, सिद्धेश गुरुप्रसाद प्रभू ग्रुप,  विक्रांत दिलीप सावंत ग्रुप व अमृत अशोक जामदार ग्रुप यांनी उत्‍तेजनार्थ क्रमांक पटकावले. या विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार, ५ हजार, व उत्तेजनार्थ प्रत्येकी २ हजार अशी रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

तसेच वेशभूषा स्पर्धेत इयत्‍ता पहिली ते चौथी या गटामध्‍ये रघुवीर अमृत काणेकर प्रथम, अनन्‍या वसंत नंदगिरीकर द्वितीय, प्राची तुकाराम मिसाळ तृतीय, आदर्श रामदास पवार व प्रसन्‍ना नारायण बर्वे यांनी उत्‍तेजनार्थ पारितोषिक पटकावले. तर इयत्‍ता पाचवी ते दहावी या गटामध्‍ये स्‍नेहल मंगेश चुडजी प्रथम, ओजस आशिष पाडगांवकर द्वितीय, खुशी रविंद्र मठकर तृतीय पारितोषिक पटकावले. विजेत्यांना चित्रकला साहित्य बक्षीस देण्यात आले. परिक्षक म्हणून कैवल्‍य पवार यांचा देखील मान्‍यवरांच्‍या हस्‍ते यथोचित सन्‍मान करण्‍यात आला. 

यावेळी स्‍वातंत्र्यसेनानी कै. बाळकृष्‍ण शिवराम पडवळ यांचे वारसदार विलास बाळकृष्‍ण पडवळ यांचा सन्मान मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांच्‍या हस्‍ते करण्यात आला. वेंगुर्ला नगरपरिषदेस प्राप्‍त झालेल्‍या  विविध  पुरस्‍कार/ मानांकने यामध्‍ये मोलाची भूमिका बजावणा-या स्वच्छता कर्मचा-यांपैकी बाबुराव जाधव, धनंजय काळसेकर, मोतीराम जाधव यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्‍मान करण्‍यात आला. शासनामार्फत लागू करण्‍यात आलेल्‍या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍यात महत्‍वाची भूमिका बजावणा-या सर्व कार्यालयीन अधिकारी व कर्मचा-यांचा सुद्धा सन्‍मान यावेळी करण्‍यात आला. 

तिरंगा शपथ घेवून या कार्यक्रमाचा समारोप करण्‍यात आला. यावेळी व्‍यासपीठावर मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ, परिविक्षाधिन मुख्‍याधिकारी प्रतिक थोरात, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, उमेश येरम, श्रेया मयेकर व प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन वैभव म्हाकवेकर यांनी  केले.