छोट्यांनी लुटला शेतीचा आनंद

Edited by: विनायक गांवस
Published on: July 14, 2024 06:10 AM
views 210  views

सावंतवाडी : "बळीराजासाठी एक दिवस" या उपक्रमांतर्गत भटवाडी येथील कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त विद्यालय भटवाडी शाळा नं. 6 प्राथमिक शाळेच्या शिक्षक व मुलांनी बांधावरची शाळा अनुभवली. भटवाडी येथीलच शेतकरी परशुराम गावडे यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष तरवा काढणी व भात लावणी आदी शेतीच्या विविध कामांचा त्यांनी आनंद लुटला. शाळेतील अभ्यास, खेळ, विशेषतः मोबाईल व कॉम्प्युटरवर रमणाऱ्या चिमुकल्या हातांमध्ये भाताची रोपं आल्यावर मुलांचा आनंद अवर्णनीय दिसत होता. एरवी मैदानात खेळणारी ही मुलं चिखल माती तुडवीत प्रत्यक्ष चिखलात उतरून शेतीचा आनंद घेताना चिखलातून उगवलेल्या कमळांप्रमाणेच भासत होती. 


विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शेतकरी म्हणजेच बळीराजाबद्दल यांच्या मनात आदर व प्रेम निर्माण व्हावे. आपला देश शेतीप्रधान असल्याने शेती विषयी माहिती मिळावी. मुलांना शेतीचे महत्व पटावे, शेतीसाठी लागणाऱ्या बी-बियाणांची ओळख व्हावी, शेतीची अवजारे, खते, कीटकनाशके ह्या गोष्टींचा परिचय व्हावा या हेतूने जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यावतीने "बळीराजासाठी एक दिवस" हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

याच उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय भटवाडी सावंतवाडी शाळा नं. 6 या शाळेतील, शिक्षकांनी मुलांसोबत शेतीत जाऊन एक दिवस बळीराजासाठी उपक्रमात सहभाग घेत प्रत्यक्ष बांधावरच शाळा भरविली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे दिलीप भालेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा समीक्षा खोचरे, उपाध्यक्ष पुनम तूयेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, शाळेचे मुख्याध्यापक केशव जाधव, शिक्षिका सायली लांबर,बालवाडी शिक्षिका गावडे बाई, देऊ गावडे, दीपा गावडे, श्री तेजम व इत्यादी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेतकरी परशुराम गावडे व त्यांच्या कुटुंबीयांनी मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचे शाळेच्यावतीने विशेष आभार मानण्यात आले.