दोडामार्ग : केर निडलवाडी येथे हत्तींचे पुनरागमन झाले असून हत्तींनी भातशेती पायदळी तुडवत मोठे नुकसान केले आहे. यात ठको वाघो गावडे या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. पिके कापणीच्या वेळेत हत्ती दाखल झाल्याने शेतकरी मात्र हवालदित झाला आहे.
केर, मोर्ले परिसरात वावरणारे हत्ती काही दिवसांपूर्वी निघून गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. शेतकऱ्यांनी केलेली भात, नाचणी ही पावसाळी पिके आता पक्व होऊन कापणीसाठी आली आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या आनंदावर जणू विरजणच पडले आहे. कारण सोमवारी रात्री हत्तींचे या भागात पुनरागमन झाले आहे. निडलवाडी येथील शेतकरी ठको गावडे यांची भात शेती हत्तींनी पायदळी तुडविली. यात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेली शेती हत्तींच्या भक्ष्यस्थानी पडणार की काय? या चिंतेने येथील शेतकरी ग्रासला आहे. वनविभागाने या हत्तींचा लवकरच बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.