पाचाडमध्ये कृषी दिन

Edited by: मनोज पवार
Published on: July 01, 2025 15:18 PM
views 279  views

चिपळूण : हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त, तालुक्यातील पाचाड येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज पाचाड-शिरळ आणि कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी पाचाड गावचे सरपंच नरेशशेठ घोले, माजी तंटामुक्त अध्यक्ष  सदाशिव घोले, ग्रामसेवक चंद्रकांत तटकरे, उद्योजक रामकृष्ण मोरे, प्राचार्या डॉ. यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रा. कोकाटे सर, प्राचार्या डॉ. यादव, सरपंच श्री. घोले व सयाजी ढोणे यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी कृषी क्षेत्रातील नाईक यांच्या मोलाच्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कोकाटे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. अभय कदम यांनी केले.

कार्यक्रमानंतर परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला. मान्यवरांच्या हस्ते झाडांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांचा या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग लाभला. या उपक्रमामुळे परिसरात हरित वातावरण तयार होण्यास मदत झाली.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे तसेच ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभय कदम, सयाजी ढोणे, आदित्य शेंडे, अमोल रामगुडे, रोहित रोंगे, आकाश जाधव, तुषार जाधव, शुभम जाधव, गणेश गायकवाड, किरण खिलारे, निरंजन दत्त बडदे व अन्य विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमास शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.