
वेंगुर्ले : पालकरवाडी येथे उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे च्या कृषीदूतांनी स्थापन केलेल्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे उद्घाटन गावचे प्रगतशील शेतकरी कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शिवराम गोगटे यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे चे डॉ. संदीप गुरव, डॉ. गिरीश उईके तसेच कृषिभूषण पुरस्कार प्राप्त संतोष गाडगीळ, पालकरवाडी गावचे सरपंच सदाशिव यशवंत पाटील, वेतोरे गावच्या सरपंच प्राची नाईक व उपसरपंच उपस्थित होते.
सध्याची शेती व शेतीपूरक व्यवसायाला ऊर्जित अवस्था आणायचे असेल तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक पंचक्रोशीतील मुख्यरस्त्या बाजूला कृषी माहिती केंद्राची नीतांत गरज आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेती करताना येणाऱ्या विविध अडचणी तसेच झाडांवरील कीटक व रोग यावर नियंत्रण करणे व एकात्मिक शेती करून शेतीतील उत्पन्न वाढवणे हे या केंद्राचा हेतू आहे.
या कार्यक्रमांमध्ये कृषीभूषण प्राप्त संतोष गाडगीळ यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. संदीप गुरव व डॉ. गिरीश उईके यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणींना उत्तर दिले. पालकरवाडी गावचे सरपंच सदाशिव पाटील, वेतोरे गावच्या सरपंच प्राची नाईक यांचेही मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम येणाऱ्या दिवसांमध्ये पालकरवाडी मध्ये या कृषिदुतांकडून पार पडतील.
शेतकऱ्यांना मिळणार ही माहिती
या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रामार्फत जास्तीत जास्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून विविध कृषीविषयक प्रश्नांचे निरासन करण्यात येणार आहे. पिक लागवडीपासून ते पिक काढणीपर्यंतचे मार्गदर्शन, दापोली विद्यापिठाने विकसित केलेल्या विविध पिकांच्या जाती, विविध पिकांवरील किड रोग आणि त्यांचे नियंत्रण, पिकांच्या अचुक उत्पादन पद्धती, सुधारित कृषी अवजारे व साधणे आणि कृषी प्रकिया अभियांत्रिकी व तंत्रज्ञान याबद्दलची सखोल माहिती शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रामार्फत मिळणार आहे. विविध भाजीपाला लागवड, फळपिके आणि मसाला पिके लागवड यांची सखोल माहिती मिळणार आहे.