
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युती होणार असल्याची घोषणा सावंतवाडीत युतीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केली. युतीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याची माहिती यावेळी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच एकत्र येत निर्णय घ्यावा असं मत होतं. त्यानुसार सर्व नेते मंडळी एकत्रीत आलो आहोत. आजपासून ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे अशा ठिकाणी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना हे दोन पक्ष जिल्ह्यात एकत्र येत युतीच्या माध्यमातून लढणार आहे. सर्वांना विश्वासात घेऊन, सल्ला मसलत करून निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी तालुकानिहाय बैठक घेतल्या जाणार असून युती व्हावी या संदर्भातील सुचना स्थानिक नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
दोन्ही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याची इच्छा होती. मात्र, पक्ष नेत्यांनी आदेश दिले त्यानुसार जास्तीत जास्त ठिकाणी युतीच्या माध्यमातून लढणार, वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील वाटचाल होणार असल्याचे मत
नेत्यांनी व्यक्त केले. दोन पक्ष एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं हा संदेश पुन्हा एकदा राज्यात पोहचवायचा आहे. त्यासाठी नेत्यांनी राज्याच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतला आहे. यात खालचे कार्यकर्ते दूखवणार नाही याचीही काळजी आम्ही घेणार आहोत. स्थानिक कार्यकर्ते, नेत्यांची समजूत घालत सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाऊ. एकटे लढलो असतो तरी जिंकलो असतो, आज खरेदी-विक्री संघानंतर पुन्हा एकत्र आलो आहोत त्यामुळे महाविकास आघाडीला पुन्हा धूळ चारू असा विश्वास व्यक्त करत आमच्यावर कुणाचाही दबाव नसून वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही पुढे जात आहोत अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
संजू परब नाराज ?
ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्गात भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युती होणार असल्याची घोषणा युतीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब अनुपस्थित राहिले. सावंतवाडी तालुक्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युती नको अशी भूमिका त्यांनी घेतली होती. कार्यकर्त्यांची इच्छा स्वबळावर लढण्याची आहे, त्यामुळे नेत्यांना आम्ही समजावू असं ते म्हणाले होते. दरम्यान, युतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्वबळाचा नारा देणारे संजू परब नाराज झालेत का ? असं विचारलं असता ''संजू परब हे नाराज नाही, प्रत्येकाचा दौरा ठरला आहे. गाव वाटून घेतली आहे, नाराजी वगैरे असं काहीही नसून सर्व सहकाऱ्यांसोबत बैठक घेत वरिष्ठांकडून आलेला निर्णय त्यांना सांगून त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे अस मत तेलींनी व्यक्त केले. यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, मनोज नाईक, बबन राणे, महेश धुरी, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, परिक्षीत मांजरेकर आदी उपस्थित होते.