मंत्री केसरकरांच्या आश्वासनानंतर घेराव मागे | 'त्या' मृत युवकांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्याचं आश्वासन

Edited by: विनायक गावस
Published on: September 27, 2023 17:19 PM
views 139  views

सावंतवाडी : भेडला माड कोसळून मृत्यू झालेल्या दोन्ही युवकांच्या मृत्यूस पालिका प्रशासन जबाबदार असून दोघांच्या कुटुंबास आर्थिक नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका अंजिवडे ग्रामस्थासह येथील राजकिय पुढाऱ्यांनी घेतली. धोकादायक झाडे हटवा अशी दोन वर्ष मागणी करुनही पालिकेने दुर्लक्ष केल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोपही उपस्थितांनी केला. मात्र त्या ठिकाणी आलेल्या स्थानिक आमदार शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मध्यस्थी करत संबंधित कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच शासकीय विम्यातून मदत मिळवून देण्यासोबत स्वतः आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिल्याने संबधितांनी हा घेराव मागे घेतला.

सावंतवाडी शहरात मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास  राजवाड्या नजिक भेडले माडाचे झाड कोसळून अंगावर पडल्याने आंजीवडे येथील राहुल प्रकाश पंदारे (24) व संभाजी दत्ताराम पंदारे (21) या दोघा युवकांचा मृत्यू झाला. दरम्यान ज्या परिसरात ही घटना घडली त्या परिसरात असलेली धोकादायक झाडे तोडण्यात यावी या झाडापासून जीवित हानी होऊ शकते अशी मागणी त्या परिसरात टेम्पो व्यवसाय करणाऱ्या टेम्पो चालकांकडून पालिका प्रशासनाकडे केली होती तब्बल दोन वर्ष याबाबत त्यांच्या पाठपुरावा सुरू होता परंतु  झाडे ही खाजगी जागेत असल्याने पालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आला होता एकूणच काल घडलेल्या घटनेनंतर याला जबाबदार पालिका प्रशासन आहेत असे सांगत माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांच्यासह टेम्पो मालक व आंजिवडे ग्रामस्थांनी पालिकेमध्ये धडक दिली. यावेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले मात्र त्यांच्याकडून समपर्क उत्तर न मिळाल्याने मुख्याधिकाऱ्यांना पालिकेत पाचरण करण्यात आले. तब्बल तासाभराच्या अंतराने पालिकेत दाखल झालेल्या मुख्याधिकाऱ्यांना पुन्हा एकदा ग्रामस्थांसह राजकीय पुढार्‍यांनी धारेवर धरले जोपर्यंत संबंधित दोन्ही कुटुंबीयांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मांडली.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, जिल्हा बँक संचालक महेश सारंग ऍड निता गावडे, ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ माजी नगरसेवक नासिर शेख आनंद नेवगी, राजू बेग,कुडाळ पंचायत समितीच्या माजी उपसभापती श्रेया परब, पंचायत समिती माजी सदस्य प्राजक्ता केळुस्कर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष समीर वंजारी रवींद्र मडगावकर, योगेश गवळी सुधीर दळवी बाबुराव भालेकर कृष्ण पंदारे, सागर पंदारे,योगेश पंदारे, विजय पंदारे, शांताराम हनफडे, भाई शिर्के ,सतीश नर्वेकर, संजय नाईक, रुपेश सावंत, बंड्या तूयेकर, कृष्णा राऊळ, केदू शेळके, गोट्या माळकर, बाळू सावळ आदी टेम्पो मालक उपस्थित होते.

 यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी आपली बाजू मांडताना घडलेली घटनाही दुर्दैवी आहे पालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचा सर्वे केला जातो परंतु सदरचे कोसळलेले झाड हे खाजगी मालमत्तेत येत असल्याने त्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची नसते. यासंदर्भात पाच वर्षांपूर्वी संबंधित झाडे तोडण्याबाबत प्रशासनाकडून नोटीस बजावण्यातही आल्या होत्या. परंतु आता संबंधित दोन्ही कुटुंबीयांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत आवश्यक ता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी झाड पडून देखील करंट सुरु असल्यानं व लाईनवर आलेल्या फांद्याबाबत दुर्लक्ष केल्यानं महावितरणला अँड निता कविटकर यांनी धारेवर धरलं. तर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत मृत पंदारे यांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच मत व्यक्त केले. झालेला प्रकार हा दुर्दैवी असल्यास ते म्हणाले.

यावेळी दीपक केसरकर यांनी झालेली घटना ही दुर्दैवी आहे. मात्र या सर्वाला जबाबदार कोण यामध्ये वाद घालत बसण्यापेक्षा संबंधित कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा विचार होणे गरजेचे आहे. आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तसेच गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून संबंधित कुटुंबियांना मदत मिळवून येणार आहे. शिवाय या व्यतिरिक्त अन्य योजनेतून त्यांना मदत मिळू शकते का याचाही प्रयत्न करणार आहे. आपण वैयक्तिक मदतही कुटुंबीयांना देणार असल्याचे स्पष्ट केले. मंत्री केसरकर यांनी दिलेल्या या आश्वासनानंतर ग्रामस्थांसह राजकीय पुढार्‍याने घेराव मागे घेतला.