नितेश राणेंच्या दणक्यानंतर प्राचार्य वठणीवर | वीस मिनीटांत परिक्षार्थी मुलांच्या हाती पुस्तक

Edited by: विनायक गावस
Published on: March 10, 2024 08:28 AM
views 1104  views

सावंतवाडी : सांगेली नवोदय विद्यालयात जेवणातून झालेल्या विषबाधेच्या प्रकारानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भेट देत विद्यार्थ्यांची विचारपूस केली. रूग्णालयात उपचार घेत असलेल्या काही मुलांची दहावीची परीक्षा सोमवारी असताना रात्री उशीरापर्यंत विद्यालयाकडून त्यांना पुस्तक मिळाली नव्हती. याबाबत मुलांनी नितेश राणेंकडे व्यथा मांडली असता त्यांनी प्राचार्यांची फोनवरून कानउडघनी केली. यानंतर अवघ्या वीस मिनीटांत परिक्षार्थी मुलांच्या हाती पुस्तक पोहचली. 

एका हाताला सलाईन लागलेलं असताना त्या अवस्थेत परिक्षेचा ताण असणारी ही मुलं विद्यालयाकडून पुस्तक मिळतील या प्रतिक्षेत होती. प्राचार्यांकडे मागणी करून देखील रात्री उशीरापर्यंत ही पुस्तक मुलांपर्यंत पोहचली नव्हती. अखेर रात्री भेटीसाठी आलेल्या आमदार नितेश राणेंकडे मुलांनी आपली कैफियत मांडली. यावेळी संतापलेल्या राणेंनी थेट प्राचार्यांना फोन करत चांगलेच खडसावले. पुस्तक मुलांपर्यंत पोहचली असं सांगणऱ्या प्राचार्यांना त्यांनी चांगलंच झापलं. आपण मुलांसमोर आहे अजूनपर्यंत पुस्तक प्राप्त झालेली नाहीत. अर्ध्यातासात पुस्तक मुलांच्या हातात दिसली पाहिजेत अशी तंबी राणेंनी प्राचार्यांना केली. यानंतर केवळ वीस मिनीटांत परिक्षार्थी मुलांच्या हाती पुस्तक पोहचली. त्यामुळे सायंकाळपासून पुस्तकांच्या प्रतिक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला. अभ्यासासाठी केवळ एकच दिवस असताना व दुसरीकडे उपचार सुरु असताना पुस्तक प्राप्त झाल्यानं विद्यार्थ्यांसमोर असलेलं टेंशन थोडंसं हलक झालं. यासाठी आमदार नितेश राणे यांचे या विद्यार्थ्यी व पालकांनी आभार मानले.