अशोक सावंत यांच्या पाठपुराव्यानंतर विज वितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळणार

Edited by:
Published on: June 08, 2023 18:41 PM
views 107  views

कुडाळ : कामगार नेते अशोक सावंत यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर विज वितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळणार आहे. भारत सरकारच्या वतीने कुडाळ एमआयडीसी येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयात कर्मचाऱ्यांनी नाव नोंदणी केल्यानंतर त्यांना या सुविधांचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील इतर कंपन्याच्या कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. 


विज वितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी कामगार नेते अशोक सावंत हे नेहमीच आवाज उठवत आहेत. कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळावे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ कार्यालय सिंधुदुर्गात व्हावे अशी मागणी त्यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे  यांच्याकडे केली होती. त्यानुसार हे कार्यालय कुडाळ एमआयडीसी येथे सुरु करण्यात आले आहे. गुरुवारी अशोक सावंत यांनी विज वितरणच्या कर्मचाऱ्यांसह या कार्यालयाला भेट दिली. येथील अधिकारी राहुल मांडवकर यांचे स्वागत केले. यावेळी सिंधुदूर्ग वीज कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप बांदेकर, महेश राऊळ, चेतन सावंत, कृष्णा पवार, दाजी कुंभार, विवेक हुले, सर्वेश साबळे आदी कामगार उपस्थित होते. 


सर्व कर्मचाऱ्यांनी नाव नोंदणी केल्यानंतर या सुविधा मिळण्यास सुरुवात होणार आहे. या महामंडळाबरोबरच आयुष्यमान भारत मार्फत सुद्धा कर्मचाऱ्यांना फायदा मिळणार असल्याचे अधिकारी राहुल मांडवकर यांनी सांगितले.