ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा : जिल्हा बार असोसिएशन

अहमदनगर वकील दाम्पत्य हत्येचा निषेध
Edited by: विनायक गांवस
Published on: January 31, 2024 10:10 AM
views 273  views

सावंतवाडी : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकील दांपत्य ॲड. राजाराम आढाव व ॲड. मनिषा आढाव यांची २५ जानेवारी रोजी निघृण हत्या करण्यात आली. या वकील दांपत्यांच्या झालेल्या या निघृण हत्येचा तीव्र निषेध करीत सदर हत्याकांडाचा सखोल तपास होऊन सर्व आरोपींना तात्काळ अटक व्हावी व त्यांचेवर त्वरीत कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट शासनाने त्वरीत संमत करून लागू करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने करण्यात आली.

या आशयाचे निवेदन असोसिएशनच्या माध्यमातून सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांना सादर करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, तालुकाध्यक्ष ॲड. नीता सावंत, ॲड. डी.के. गांवकर, ॲड. प्रकाश परब, ॲड. प्रिया भावे, ॲड. भालचंद्र शेटकर, ॲड. वीरेश राऊळ, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ॲड. प्रवीण काळसेकर, ॲड.अनिल केसरकर, ॲड.तृप्ती राऊळ, ॲड.सायली सावंत,ॲड. प्रणव आंबिये, ॲड. परशुराम चव्हाण, ॲड. टी.व्ही. कांबळे, ॲड. गोट्या केसरकर, ॲड. ठाकूर आदी उपस्थित होते.

तसेच दिवसेंदिवस राज्यात वकीलांवर हल्ले करणे, धमकाविणे, त्रास देणे असे प्रकार वाढत चालले आहेत. आढाव वकील दांपत्यांच्या झालेल्या निघृण हत्येमुळे याची दाहकता अधिक प्रकर्षाने समोर आलेली आहे. तयामुळे वकीलांच्या संरक्षणाकरीता ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तात्काळरित्या लागू करणे आता अत्यावश्यक बनलेले आहे व सदर कायद्याची तात्काळ अंमलबजावणी सुरु झाल्यास वकीलांच्या मनात निर्माण झालेली भिती दूर होऊन त्यांना व्यवसाय करताना संरक्षणाची हमी मिळणारआहे.

तरी प्रस्तुत वकील संरक्षण कायदा तात्काळ लागू करणेत यावा व त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करणेकरीता आपलेमार्फत महाराष्ट्र शासनास कळविणेत यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन तर्फे करण्यात आली.