हायवेवरील जाहिरात बॅनर अपघातांना देतायत आमंत्रण

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 16, 2025 16:24 PM
views 259  views

कुडाळ :  महामार्गांवर सध्या व्यवसायिक आणि राजकीय जाहिरातींच्या बॅनरचा सुळसुळाट वाढला आहे. व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी किंवा राजकीय प्रचारासाठी महामार्गांच्या कडेला असलेल्या विद्युत खांबांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मात्र, हे प्लास्टिकचे बॅनर केवळ विद्रुपीकरणच करत नाहीत, तर ते महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठे धोकादायक ठरत आहेत.

फाटलेले बॅनर वाऱ्याने उडतात 

हे जाहिरात बॅनर प्लास्टिकचे असल्याने ऊन आणि पावसामुळे ते लवकर खराब होतात. कालांतराने, जोरदार वाऱ्यामुळे हे बॅनर फाटून रस्त्यावर उडू शकतात.

महामार्गावर वाहनांची गती जास्त असते. अशा वेळेस जर अचानक उडणारे बॅनर एखाद्या गाडीच्या समोर आले, तर चालकाचे नियंत्रण सुटून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

तार गंजून पडण्याचा धोका

हे बॅनर बांधण्यासाठी लोखंडी तारेचा वापर केला जातो. काही कालावधीनंतर ही तार गंजून तुटते, ज्यामुळे बॅनर आणि तार दोन्ही खाली पडू शकतात. हे बॅनर पुलांखालील रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांवर किंवा पादचाऱ्यांवर पडल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते.

महामार्गांवर आधीच खड्डे आणि इतर अनेक समस्या आहेत. त्यात अशा अनधिकृत बॅनरमुळे चालकांना एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. "खड्डे चुकवावे की उडणारे बॅनर," अशी अवस्था अनेक वाहनचालकांची झाली आहे.

या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून भविष्यातील संभाव्य अपघात टाळता येतील.