ॲड. राजेंद्र रावराणे यांना पितृशोक | निवृत्त मुख्याध्यापक विश्राम कुंडलीक रावराणे यांच निधन | निधनानंतर केलं देहदान

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 26, 2023 15:21 PM
views 216  views

वैभववाडी : तालुक्यातील सांगुळवाडी येथील निवृत्त मुख्याध्यापक विश्राम कुंडलीक रावराणे ( वय ८५) यांच काल सोमवार ता. 25 रात्री ७.३० वा. कोल्हापूर येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह डाॅ. डि. वाय. पाटील मेडिकल कॉलेज रुग्णालयाला देहदान केला.

विश्राम रावराणे हे तालुक्यात रावसाहेब या नावाने परिचित होते.त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम केले.तालुक्यात आचिर्णे येथे त्यांनी प्रथम माध्यमिक विद्यालय सुरू केले.ते नावारूपाला आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेकडे हस्तांतरित केले. त्यानंतर रत्नागिरी पाली येथे एक विद्यालय सुरू केले.या विद्यालयात त्यांनी अनेक वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले.अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले.सध्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना ते गुरू म्हणून लाभले होते. शैक्षणिक क्षेत्रासोबतच त्यांनी सहकार व  राजकारणात सक्रियपणे काम केले होते.वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून काम केले होते.तसेच वैभववाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बरेच वर्षे तालुका अध्यक्ष होते.याकाळात त्यांनी तालुक्यात काॅग्रेस तळागाळापर्यंत पोहचवली होती.

रावसाहेब हे कडक शिस्तीचे होते.त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी आपला देह दान करायचा अशी सक्त सुचना दिली होती.त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांनी मृत्यूनंतर कोल्हापूर येथील डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेजला हा मृतदेह दान केला. त्याच्या पश्चात तीन मुलगे,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.प्रसिद्ध वकील राजेंद्र रावराणे यांचे ते वडील होत.