सोनुर्ली जत्रौत्सव सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी

मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रशासनास सूचना
Edited by: विनायक गावस
Published on: November 26, 2023 17:39 PM
views 63  views

सावंतवाडी : सोनुर्ली माऊलीचा जत्रौत्सव सुरळीत आणि उत्साहात साजरा होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी अशा सुचना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. मंत्री केसरकर यांनी शनिवारी रात्री सोनुर्ली माऊली मंदिराला भेट देत तेथील देवस्थान कमिटी व ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी उपस्थित प्रांताधिकारी प्रशात पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील तसेच पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीचा वार्षिक उत्सव मंगळवारी 28 नोव्हेंबरला साजरा होत आहे. यानिमित्ताने मंदिर परिसरामध्ये युद्धपातळीवर काम सुरू आहे.

देवस्थान कमिटी कडून आवश्यक ती सोयी सुविधा राबवले जात असतानाच स्थानिक आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी रात्री सोनुर्लीत दाखल होत देवस्थान कमिटीशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर,तहसीलदार श्रीधर पाटील पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी उपस्थित होते. देवस्थान कमिटीचे बाळा गावकर देवस्थानचे प्रमुख राजेंद्र गावकर रमेश गावकर सरपंच नारायण हिराप आदीही यावेळी उपस्थित होते. दरम्यान जत्रोत्सवाला पावसाचे असलेले सावट लक्षात घेता मंत्री केसरकर यांनी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन देवस्थान कमिटीला दिले शिवाय तेथे उपस्थित असलेल्या पोलीस प्रशासन तहसीलदार यांच्याशी चर्चा करताना जत्रोत्सव सुरळीत आणि उत्सवात पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा राबवा भाविकांना जत्रोत्सवाला येताना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी पोलीस कुवत वाढवा ट्रॅफिक होऊ नये यासाठी योग्य तो बंदोबस्त नेमा अशा सूचना केल्या.देवस्थान कमिटीच्यावतीने मंत्री केसरकर यांचा सत्कार करण्यात आला.