तळवडे शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस स्थगिती

Edited by: दिपेश परब
Published on: September 10, 2023 11:34 AM
views 95  views

सावंतवाडी : तळवडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव या दोघांनी १० सप्टेंबर या एकाच दिवशी आयोजित केलेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभांना जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सानिका जोशी यांनी स्थगिती दिली आहे. पुढील निर्णय होईपर्यंत सभा आयोजित न करण्याचे आदेशही दिले आहेत.

    तळवडे गावातील शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था गेली अनेक वर्षे श्री जनता विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय तसेच  मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल अशी २ महाविद्यालये चालवतात. या संस्थेच्या संचालकांमध्ये अनेक मतभेद असल्याने याबाबतचे खटले जिल्हा न्यायालय व सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित आहेत. तसेच संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत ही सन २०१२ मध्ये संपून देखील तब्बल १० वर्षे निवडणूक घेतली गेली नाही. असे असताना संस्था अध्यक्षांनी १० सप्टेंबर २०२३ रोजी नूतन सभासदांना डावलून जुन्या सभासदांची सभा आयोजित केली. त्यामुळे संस्था सचिव यांनी सर्व जुने व नवीन सभासदांची त्याचदिवशी सभा आयोजित केली. यावरून हे प्रकरण न्यायालयात गेले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने पुढील आदेश होईपर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा न घेण्याचे आदेश दिले आहेत.