
दापोली : आपले हिंदुत्व स्पष्ट आहे. आपल्या हिंदुत्वात हृदयात राम व हाताला काम आहे. मात्र विरोधकांचे हिंदुत्व इतरांचे घर जाळणारे असल्याचा घणाघात शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दापोली येथे केला.
दापोली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या निवडणूक प्रचाराकरिता आले असता ते बोलत होते. ते यावेळी बोलताना पुढे म्हणाले की आज येथे ६० टक्के महिलांची उपस्थिती आहे ते कौतुकास्पद आहे. येथील गद्दार, चिंधीचोर व गुंड यांना घाबरण्याचे काम नाही. गल्लीतल्या गुंडांना पण आपण फार मोठे वाटतो. आपण येथील जनतेला, मतदारांना हिम्मत द्यायला आलेलो आहोत. येथील मतदारांवर जनतेवर जर कोणी हात उचलला तर आपले सरकार आल्यावर त्यांना आपण बर्फाच्या लादीवर झोपवू असा इशारा देखील त्यांनी यावेळी बोलताना दिला
ते पुढे म्हणाले की उद्धव ठाकरे हे घरी एकच असतात व बाहेर देखील एकच असतात. ४० आमदार सोडून गेल्यानंतर देखील त्यांनी आता लढायचे आहे असा संदेश आपल्याला दिल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे हे मनात आणलं असतं तर आपल्या पदाला चिकटून राहिले असते. मात्र त्यांनी पद गेल्याची दुःख केले नाही. मात्र महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर गुजरातला गेल्यावर त्यांना अतोनात दुःख झाले. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून साडेसहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आपल्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात आली. येथील उद्योगपती देखील उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीपदाला प्राधान्य देतात. कारण उद्धव ठाकरे मंत्री असताना राज्य स्थिरता असते असे येथील उद्योगपतींचे मत आहे. यामुळे उद्योगपतींना देखील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे हवे आहेत. उद्धव ठाकरे हे स्वतःचा विचार न करता प्रथम राज्याचा विचार करतात. सध्या राज्यात रोजगार निर्मिती बंद झालेली आहे. आहेत ते उद्योग व रोजगार गुजरातला पळवले जात आहेत. येथील तरुणांच्या कपाळावर जात धर्म लिहिलेली असत नाही. येथील तरुणांना काम हवे असते. आपले सरकार सत्तेवर आल्यावर येथील तरुणांना चार हजार रुपये रोजगार भत्ता, मुलांना मुलींप्रमाणे मोफत शिक्षण, लाडक्या बहिणींना दरमहा ३ हजार रुपये व सहा सिलेंडर, मोफत एसटीचा प्रवास, तसेच सर्वांकरिता २५ लाखाची कॅशलेस ट्रीटमेंट देखील देणार असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. तसेच शेतकऱ्यांकरिता ३ लाखापर्यंत कर्जमुक्ती, जातनिहाय जनगणना करणार असल्याचे सांगून आरक्षण मर्यादा वाढवणार असल्याचे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.
शिंदे सरकारने समाजात जातीय तेढ निर्माण केली. शिंदे सरकार हे घटनाबाह्य सरकार आहे. शिंदे सरकारच्या काळात भ्रष्टाचार टिपेला पोचलेला आहे. मालवण येथील शिवरायांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळला. घटनाबाह्य सरकार बसवून संविधानाचा अवमान करण्यात आलेला आहे असा घणाघात देखील त्यांनी यावेळी बोलताना केला. तसेच आपण येथे बदला घेण्यासाठी नाही तर बदलाव करण्यासाठी आलेलो आहोत असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजप व संघ कार्यकर्त्यांना दोन वर्षात तुम्हाला काय मिळाले असा प्रश्न विचारला. सध्या मंत्रिमंडळात असलेले १० मंत्री हे शिवसेनेतून फुटून आलेले आहेत. ९ मंत्री राष्ट्रवादीतून फुटून आलेले आहेत. भाजपच्या असणाऱ्या दहा मंत्र्यांपैकी केवळ सहा मंत्री हे मूळ भाजपचे आहेत. चार जण बाहेरून आलेले आहेत. ज्यांच्या विरोधात भाजप व संघाचे कार्यकर्ते कायमचे लढले, केसेस अंगावर घेतल्या, तुरुंगात गेले त्यांच्याच पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवारांना पालकमंत्री म्हणून बसवण्यात आले. दोन वर्षांमध्ये महामंडळे, मंदिरांचे न्यास यावर फुटीरगटाचे प्राबल्य आहे. यामुळे या दोन अडीच वर्षात भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांना नेमके काय मिळाले असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.
आमदार योगेश कदम यांचा नामोल्लेख न करता त्यांना आदित्य ठाकरे यांनी स्थानिक गद्दार म्हणून शिंदे व स्थानिक गद्दार हे तुम्हाला भाऊ वाटतात का असा प्रश्न उपस्थित महिलांना विचारला. त्याचप्रमाणे मंत्री अब्दुल सत्तार व मंत्री संजय राठोड यांची महिलांविरोधी वक्तव्य असताना हे दोन्हीही जण मंत्री मंडळामध्ये आहेत.
यावेळी बोलताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी गद्दारांना या निवडणुकीत मातीमोल करायचे आहे. याकरिता संजय कदम यांना निवडून द्या. ही लढाई गद्दार विरुद्ध खुद्दार व धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे असे ते म्हणाले. तसेच राणे पुत्रांचा उल्लेख त्यांनी चंगू मंगू असा केला. त्याचप्रमाणे उदय सामंत मस्तवाल आहेत असे म्हणाले. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असून या निवडणुकीत खुद्दारी गद्दारांना हरवेल. निष्ठेने पैशाचा पराभव होईल. याकरिता मशाल चिन्ह निवडा. धनुष्यबाण ही सध्या आपली निशाणी नाही. धनुष्यबाण ही चोरांनी चोरलेली निशाणी आहे. या निशाणीवर चुकून बटन दाबले गेले तर ते चोरांना दिलेली साथ होईल. रामदास कदम यांनी कुणबी समाज, मुस्लिम समाज व माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याबाबत नेहमी अपशब्द वापरलेले असून याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर उपलब्ध आहेत. यामुळे मुस्लिम समाज, कुणबी समाज त्यांना कधीही जवळ करणार नाही. रामदास कदम हे डूख धरणारे साप आहेत. सध्या ते निवडणुकीत शांत बसतील, बिळात बसतील. मात्र निवडणूक झाल्यावर भाजपला डंक मारल्याशिवाय राहणार नाहीत. योगेश कदम यांना पाडण्याची सोय खुद्द रामदास कदम यांनीच केली असल्याची टीका भास्कर जाधव यांनी यावेळी बोलताना केली.
यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम म्हणाले की रामदास कदम रडतात. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करायची गरज असल्याचे भाजपचे स्थानिक नेते म्हणत आहेत. दापोली मतदार संघात जर कित्येक कोटींची कामे झालेली आहे तर दापोली खेड रस्त्याची दुरवस्था का? दापोली तालुक्यातील इतर रस्त्यांची दुरावस्था का? असा प्रश्न त्यांनी विचारला तसेच या निवडणुकीत गद्दारांचा हिशोब करायचा आहे. त्यांच्या भूलथापांना बळी पडायचे नाही. असे सांगून ३९२ पैकी ३२५ मतदान केंद्रात सध्या आघाडी आघाडीवर असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी बोलताना केला. तसेच या निवडणुकीच्या माध्यमातून मतदार संघातून व कोकणातून दहशत कायमची संपवा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संजय कदम, डॉ. चंद्रकांत मोकल, सचिन कदम, आ. भास्कर जाधव, अमोल कीर्तिकर, सदानंद कदम, सायली कदम, माधव शेटे, मुजीब रूमाणे, खालीद रखांगे, विक्रांत जाधव, ऋषिकेश गुजर, शंकर कांगणे, सचिन तोडणकर, भाऊ मोहिते, डॉ. उमेश पवार, सौ. अंबरे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. यावेळी दापोली नगरपंचायतिचे उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांचेसह त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.