
दापोली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीचे दापोली मतदार संघाचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारार्थ तसेच जम्बो पक्षप्रवेशासाठी २८ ऑक्टोबर रोजी दापोली दौऱ्यावर येणार होते मात्र वरीष्ठ पातळीवर महाविकास आघाडीची बैठक असल्याने त्यांनी आपला दापोली दौरा रद्द केला असल्याची माहिती शिवसेना ऊबाठाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी दिली आहे.
दापोलीत विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार असून या मतदार संघात महाविकास आघाडीला विजयाच्या आशा आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या पाठींब्यासाठी राष्ट्रवादीतील स्वतंत्र गट केलेले सात नगरसेवक, अनेक पदाधिकारी माजी, जि. प. व पं . स. सदस्य , माजी नगराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकारी शिवसेना उबाठा मध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. या जम्बो पक्षप्रवेश सोहळ्यासाठी पक्षाचे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे येणार होते मात्र त्यांचा हा दौरा रद्द झाला असून पुढील दौरा लवकरच जाहीर करणार असल्याचेही ऋषिकेश गुजर यांनी दापोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.