आडाळी एमआयडीसीच्या कामांना गती देणार : जिल्हाधिकारी तावडे

'लाँग मार्च'च्या वर्षपूर्तीनिमित्त भेटले शिष्टमंडळ
Edited by: संदीप देसाई
Published on: August 20, 2024 09:51 AM
views 162  views

सिंधुदुर्ग : आडाळी एमआयडीसीबाबत स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची त्वरित आढावा बैठक घेऊन कामांना गती देऊ, अशी ग्वाही जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आज आडाळीच्या शिष्टमंडळाला दिली.

आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समिती आणि 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' संचलित आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समितीच्या शिष्टमंडळाने आज श्री. तावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. या शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष व आडाळीचे सरपंच पराग गावकर, 'घुंगुरकाठी'चे अध्यक्ष व समितीचे समन्व्यक सतीश लळीत, सचिव प्रवीण गावकर यांचा समावेश होता. आडाळी (दोडामार्ग) येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रातील भूखंड उद्योजकांना वाटप करुन कारखाने उभारणीचा मार्ग मोकळा करावा, या मागणीसाठी नागरिकांनी गेल्यावर्षी याच दिवशी आडाळी ते बांदा असा आठ किलोमीटरचा शांततापूर्ण लाँग मार्च काढला होता. तथापि, गेल्या वर्षभरात ठोस काहीही घडलेले नसल्याची जाणीव करुन देण्यासाठी हे शिष्टमंडळ आले होते.

आडाळी औद्योगिक क्षेत्राच्या अतिशय सोयीच्या व वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानामुळे या ठिकाणी आपला उद्योग सुरु करण्यासाठी महाराष्ट्रासह गोवा व अन्य राज्यातील  उद्योजकही उत्सुक आहेत. आज आठवड्याला सरासरी 2 ते 3 उद्योजक या क्षेत्राला भेट देऊन भूखंड घेण्यासाठी उत्सुकता दाखवत आहेत. आतापर्यंत लघु व मध्यम स्वरूपाच्या अनेक उद्योजकांनी या क्षेत्राला भेटी देऊन भुखंड घेण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. आम्ही स्थानिक पातळीवर महामंडळाला सर्वोतोपरी सहकार्य करत आहोत. किंबहुना रत्नागिरी येथील प्रादेशिक अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे भूखंड खुले करण्यासाठी विनंती करत आहोत, मात्र दुर्दैवाने या कार्यालयातून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, असे श्री. पराग गावकर यांनी श्री. तावडे यांच्या निदर्शनास आणले.

आम्ही स्थानिक एवढ्या सकारात्मकतेने या प्रकल्पासाठी सहकार्य करत आहोत, तरीही येथे एकही प्रकल्प अद्याप उभा झालेला नाही, याची आम्हाला खंत वाटते. आज अनेक उद्योजक येथील भूखंडाच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांना भुखंड वितरित झाले, त्यांचे प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झालेले नाहीत. दोडामार्ग तालुका अतिशय दुर्गम असुन औद्योगिकदृष्ट्या मागासलेला आहे. येथील युवकांना रोजगाराच्या कोणत्याही संधी येथे उपलब्ध नाहीत. त्यामुळे रोजगारासाठी गोवा राज्यावर अवलंबुन रहावे लागते. यामुळेच या तालुक्यातील जनता या औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीकडे व येथे येणाऱ्या उद्योगांकडे डोळे लावुन बसलेली आहे, ही बाब लक्षात घेऊन आपण व्यक्तिश: या कामांचा आढावा घ्यावा, अशी विनंती सतीश लळीत यांनी केली.

याचबरोबर केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने आडाळी औद्योगिक क्षेत्रामध्ये आयुर्वेदिक वनस्पती संशोधन केंद्रासाठी जमीन घेतली आहे. तथापि, अद्याप केंद्राचे कोणत्याही प्रकारचे काम अद्याप सुरु झालेले नाही. या केंद्राचे काम सुरु होण्यासाठी आपल्या स्तरावर आयुष मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा, अशीही विनंती त्यांनी केली.

आडाळी ग्रामस्थांनी अगदी सुरुवातीपासुन या प्रकल्पाला संपुर्ण सहकार्याचे धोरण स्वीकारलेले आहे. यामुळे आमच्या या विनंतीलाही सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. आपण स्वत: जिल्हाधिकारी या नात्याने याप्रकरणी लक्ष घालुन आपल्या स्तरावर महामंडळाकडे पाठपुरावा करावा, अशी  विनंती आहे. या मागणीकडे असेच दुर्लक्ष झाल्यास नाईलाजाने आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावे लागेल, हे आम्ही नम्रपणे आपल्या निदर्शनास आणीत आहोत, असे शिष्टमंडळाने निवेदनात म्हटले आहे.