
दोडामार्ग : औद्योगिक विकासाची संधी असतानाही केवळ राजकीय नेतृत्वाच्या नकारात्म व उदासीन मानसिकतेमुळे आडाळी एमआयडीसी ला अपेक्षित गती मिळाली नाही. स्थानिकांचा तीव्र विरोध असलेले वेळागर ताज असो किंवा बारसूची रिफायनरी प्रकल्पाला रोजगार निर्मितीच्या गोंडस नावाखाली पुढे रेटले जाते. मात्र ज्या आडाळी प्रकल्पाला स्थानिकांनी पुर्ण सहकार्य केले त्यात प्रकल्पात उद्योग आणण्यासाठी राजकीय नेतृत्वाना गेल्या दहा वर्षांत जमले नाही, याच मुद्द्याला आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी आडाळी औद्योगिक क्षेत्र कृती विकास समिती सक्रियपणे प्रचारात उतरेल असे आडाळी सरपंच तथा समिती अध्यक्ष पराग गांवकर व सचिव प्रवीण गांवकर यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.
श्री. गांवकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लोकशाही शासन पद्धतीमध्ये निवडणुकांना महत्व आहे. मात्र निवडणुका म्हणजे शांततापूर्ण वातावरणात होणारे केवळ सत्तानंतर नसते, तर निवडणुकामध्ये जनतेच्या आशा - आकांक्षा, मागण्या आणि प्रश्न यांची चर्चा होऊन मतदारांचे प्रबोधन होणे अपेक्षित असते. त्यामुळेचं जनतेला आपले नेमके प्रश्न काय आहेत ते मांडून त्याच्या आधारे कुठल्या उमेदवाराला मत द्यायचे हे ठरवता यायला हवे. त्यामुळे केवळ राजकीय पक्ष, नेते यांनीच प्रचार करणे अपेक्षित नसते. तर प्रत्येक नागरिक, अभ्यासक, राजकीय - सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील प्रचारात आपले मुद्दे मांडणे आवश्यक असते . ज्या प्रकारे छत्र्या वाटप, शिधे वाटप आणि पैशांचे वाटप करून जे इव्हेट केले गेले तेच म्हणजे लोकप्रतिनिधी, राजकीय नेतृत्व यांचे काम असते की काय असा चुकीचा समज सार्वत्रिक झाल्यास भविष्यात लोकशाही प्रणालीच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना बगल देण्याचा प्रकार सुरु आहे. त्यामुळे निवडणुकीत प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यापेक्षा वैयक्तिक चारित्र्यहनन आणि पैशांचे बेसूरमार वाटपातून लोकशाही प्रक्रियेलाच ओंगळवाण करण्याची विकृती केली जाईल. अशावेळी जनतेपर्यंत त्यांचे प्रश्न नेमके काय आहेत, या प्रशांवर गेल्या दहा पाच वर्षात लोकप्रतिनिधीनी काय करणे अपेक्षित होते व त्यांनी नेमकं काय केले, पुढील पाच वर्षासाठी त्यांचा अजेंडा काय आहे याबाबत जागरूक नागरिक म्हणून आपण आवाज उठविण्याची गरज आहे. त्यामुळेचं आडाळी औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत राजकीय नेतृत्वाची गेल्या दहा वर्षातील आश्वासन, प्रत्यक्ष केलेले काम, शिवाय आरोग्य, शिक्षण, नागरी सुविधा आदींची चर्चा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी समिती पुढाकार घेणार आहे.