दोडामार्गात 13 दुकानांवर कारवाई

Edited by: लवू परब
Published on: June 25, 2025 20:54 PM
views 143  views

दोडामार्ग :  प्लास्टिक पिशव्यांचा वापर तथा विक्री करणाऱ्या काही दुकान व्यावसायिकांवर कसई - दोडामार्ग नगरपंचायतीने बुधवारी दंडात्मक कारवाई केली. १३ दुकानांवर कारवाई करत एकुण ३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला जातो हे. या कारवाईने मात्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. 

कसई - दोडामार्ग नगरपंचायतच्या माध्यमातून दोडामार्ग शहर पूर्णपणे प्लास्टिकमुक्त  करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. प्लास्टिक पिशवीचा वापर करू नये. प्लास्टिकमुळे होणारे त्रास, आजार हे जास्त प्रमाणात वाढत असल्यामुळे प्लास्टिक पूर्णपणे बंद करा अशी वारंवार नगरपंचायतीच्यावतीने कचरा व्यवस्थापन घंटागाडीच्या माध्यमातून नागरिकांना सूचित करण्यात येत होते. त्या अनुषंगाने नगराध्यक्ष चेतन चव्हाण व मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी मोहिम राबवण्यात आली.  बाजारपेठेतील दुकानांत जात प्लास्टिकचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली. यावेळी एकूण १३ दुकानांवर कारवाई केली. नागरिक व दुकानदारांनी प्लास्टिक मुक्त शहर करण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले.


व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे : चेतन चव्हाण 

दरम्यान या मोहिमे बाबत नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना विचारणा केली असता ते म्हणाले की प्लास्टिकमुळे आजार व रोगराई भरपूर वाढलेली आहे. मोकाट गुरे देखील प्लास्टिक पिशव्या खाताना दिसतात. त्यामुळे प्लास्टिक मुक्त दोडामार्ग शहर करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे व्यापरी व नागरिकांनी नगरपंचायतला सहकार्य करावे.