
मालवण : शिवरायांचा पुतळा उभारताना खोदकाम केलेली जागा योग्य रित्या न बुजविल्याने पुन्हा एकदा जनतेच्या भावना दुखावण्याचे काम अधिकारी आणि ठेकेदाराकडून झाले आहे. त्यामुळे कामात अनियमतता आणल्याप्रकणी अधिकारी, ठेकदारावर कारवाई करावी अशी मागणी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे यांनी केली आहे. राजकोट येथील शिवपुतळा जवळील जमीन खचल्याने त्या ठिकाणी पुन्हा भविष्यात कोणताही अपघात होण्याची भीती निर्माण होऊ शकते. याबाबत काँग्रेसने अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी यावेळी जिल्हा युवक माजी अध्यक्ष देवानंद लुडबे, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, जिल्हा युवक सचिव योगेश्वर कुर्ले, पराग माणगावकर वं इतर पदाधिकारी व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, दोन वर्षापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी उदघाटन केलेला मेढा राजकोट येथील शिवरायांचा पुतळा कोसळला. त्याठिकाणी जवळ जवळ पुन्हा चाळीस कोटीचा निधी वापरत सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पुतळा उभारला वं याचे उदघाटन महिन्याभरापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले.
पुतळा उभारण्याच्या कामासाठी जास्तीचा निधी देऊन जग विख्यात पुतळा निर्माता तसेच शासनाचे इंजिनियर, अधिकारी यांस नेमण्यात आले तरिही या कामात हलगर्जीपणा दिसून आला आहे. या ठेकेदार व अधिकारी यांनी घाई घाईत तब्बल दोन तें तीन महिण्यात हा साठ फुटी पुतळा उभारला. हा पुतळा उभारताना जवळ असलेल्या समुद्राच्या लाटाच्या माऱ्याचा अभ्यास करणं वं इथे पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा मार्ग ठेवणे गरजेचे होते. असे असतानाही समुद्राच्या अतिउच्चतम लाटेच्या जवळ भागात हा पुतळा उभारला असून पुतळ्या खालील बांधकाम वं त्याजवळील बांधकाम हे योग्य दृष्ट्या होणं गरजेचं असताना फक्त अतिघाई अन कामात अनियमितता ठेवत हा पुतळा उभारण्यासाठी घाई केली. योग्य रित्या तेथील खोदाई केलेली जागा नं बुजावता पुन्हा एकदा जनतेच्या भावना दुखावण्याचा काम या ठेकेदार वं अधिकारी यांनी केलं आहे. यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असून संबंधित ठेकेदार वं अधिकारी यांवर कामात अनियमितता आणल्या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.