घुसखोरी करून मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील हायस्पीड नौकेवर कारवाई

पुढील कारवाईसाठी आणली मालवण सर्जेकोट बंदरात
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 31, 2024 12:26 PM
views 100  views

मालवण : महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात घुसखोरी करून अवैध मासेमारी करणारी कर्नाटक मलपी येथील हायस्पीड नौका 'संनिधी 1' ही सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने पकडली. सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील निवती समोरील समुद्रात ही कारवाई करण्यात आली असून पुढील कार्यवाहीसाठी नौका मालवण सर्जेकोट बंदरात आणण्यात आली आहे. 

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिन्याभरत परराज्यातील नौकांवर करण्यात आलेली ही चौथी कारवाई ठरली आहे. परराज्यातील नौकांची महाराष्ट्र सागरी जलधी क्षेत्रात होणारी घुसखोरी, मासळीची होणारी लूट, स्थानिक मच्छिमारांचे होणारे नुकसान थांबले पाहिजे. याबाबत सातत्याने आवाज उठवून आक्रमक भूमिका मांडणारे आमदार निलेश राणे, मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांची सातत्यापूर्ण भूमिकाही यां सर्व कारवाईत महत्वपूर्ण ठरली आहे. 

मत्स्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर रोजी रोजी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य विभागाच्या शितल नौकेतून सागरी गस्ती सुरु होती. यां दरम्यान परवाना अधिकारी मालवण मुरारी भालेकर, सहकारी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक,रक्षक दिपेश मायबा, मिमोह जाधव, स्वप्निल सावजी, चंद्रकांत उर्फ भाऊ कुबल, दिवाकर जुवाटकर, शुभम राऊळ  पोलीस कॉन्स्टेबल गुरुनाथ परब यांनी कर्नाटक मलपे येथील नौका श्री संनिधी 1 क्रमांक IND-KA-02-MM-4594 महाराष्ट्र राज्याच्या जलाधी  क्षेत्रात सिंधुदुर्ग निवती समोर 10 सागरी नॉटीकल मैल क्षेत्रात अवैध्य मासेमारी करताना पकडली. पुढील कार्यवाहीसाठी नौका मालवण सर्जेकोट बंदरजेटी येथे आणण्यात आली आहे. नौकेची तपासणी, मासळीचे लिलाव व अन्य कार्यवाही सुरु होती. सदर नौका मालकाविरुद्ध महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती देण्यात आली.

मत्स्य विभागाकडून सातत्याने अवैध हायस्पीड नौकावर सुरु असलेल्या कारवाई बाबत मच्छिमार वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अशीच कारवाई सुरु राहावी अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.