जन आशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन | १४ जणांची निर्दोष मुक्तता

Edited by: गुरुप्रसाद दळवी
Published on: October 03, 2022 20:29 PM
views 169  views

सिंधुदूर्गनगरी : जन आशीर्वाद यात्रा आयोजित करून जिल्हाधिकारी यांच्या कोविड १९ आजाराच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, पणदूर सरपंच तुकाराम साईल आदींसह एकूण १४ जणांची येथील मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एम. फडतरे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्यावतीने वकील संग्राम देसाई, अशपाक शेख, अविनाश परब, यतीश खानोलकर यांनी काम पाहिले.

जिल्हाधिकारी यांच्या कोविड १९ आजाराच्या प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी ओरोस फाटा येथे जमाव करून तसेच सत्कार समारंभासाठी कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरीत्या जमाव केल्या प्रकरणी तुकाराम साईल (पणदूर), श्रीपाद तवटे (पावशी), केशव नारकर ( नारुर), संतोष वालावलकर (ओरोस), प्रभाकर सावंत (रानबांबुळी), देवेंद्र सामंत (वेताळ बांबर्डे), अंकुश जाधव (दोडामार्ग), अनंतराज पाटकर (हूमरमळा), अरविंद परब (आंबरड), विनायक आनवकर (अणाव), नूतन आईर (तुळसुली), अमोल मालवणकर ( ओरोस), सुहास परब (ओरोस), नागेश परब (बाव), यांच्यावर

भा. द. वि. १४३, १४९, १८८, २६९, २७०, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ (५), आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी मुख्य न्याय दंडाधिकारी ए. एम. फडतरे यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. यावेळी न्यायालयाने सर्व १४ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे