
कुडाळ : जिल्हा परिषदेच्या कुडाळ येथील विभागीय कार्यालयाच्या लेखा विभागाच्या चुकीमुळे ठेकेदारांना ओरोस उपविभागाचे बिल अदा झाले नव्हते, त्यामुळे ठेकेदारांनी ओरोस उपविभागातील कर्मचाऱ्यांचे पगार रोखून धरले. यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामगार नेते अशोक सावंत यांचे लक्ष वेधले असता त्यांनी कामगारांसमवेत मंडळ अधिकारी कार्यालयात धडक दिली. पगारप्रश्नी अधीक्षक अभियंत्यांचे लक्ष वेधताच त्यांनी तात्काळ संबंधीत ठेकेदारास कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले.
कंत्राटी कामगारांचे वेतन अदा न झाल्याने त्यांनी कामगार नेते अशोक सावंत यांना आपली व्यथा सांगितली. या प्रकाराची माहिती मिळताच अशोक सावंत यांनी तात्काळ दखल घेतली. आज सकाळी सर्व कर्मचाऱ्यांसमवेत त्यांनी थेट मंडळ कार्यालयात धडक दिली. अधीक्षक अभियंता यांच्यासमोर कंत्राटी कामगारांच्या पगाराचा प्रश्न मांडला. यावेळी कर्मचाऱ्यांनी पगार न मिळाल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे स्पष्ट केले.
अशोक सावंत यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर अधीक्षक अभियंता यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले. त्यांनी तात्काळ ठेकेदाराला संपर्क साधून सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याचे निर्देश दिले. अधीक्षक अभियंत्यांच्या आदेशानंतर ठेकेदाराने आजच सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले. यामुळे कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळाला. यावेळी अशोक सावंत यांनी प्रशासनाचे आभार मानले आणि भविष्यात अशा चुका होणार नाहीत अशी आशा व्यक्त केली. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही यासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.