
सावंतवाडी : आरोंदा - किरणपाणी मार्गावर मोकाट जनावरे बसलेली असल्याने रात्रीच्या वेळी अपघाताची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे प्रवाशांनी चिंता व्यक्त केली असून प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.
हा रस्ता वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. मात्र, रस्त्यावर मध्येच मोकाट जनावरे बसलेली असल्यामुळे वाहन चालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. अंधारामुळे ही जनावरे वेळेवर दिसत नाहीत, त्यामुळे अचानक ब्रेक लावताना किंवा जनावरांना चुकवताना अपघात होण्याची भीती आहे.
अनेकवेळा जनावरांना वाचवण्यासाठी चालकांना अचानक ब्रेक लावावा लागतो, ज्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांनाही धोका निर्माण होतो. या समस्येवर वेळीच तोडगा न काढल्यास एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.










