
दोडामार्ग : दोडामार्ग तिलारी राज्य मार्गावर झरेबांबर तिठा येथे भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाने शुक्रवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या दरम्यान आपली सात वर्षाची पुतणी श्रीया गवस हिला धडक देऊन तिच्या अंगावर टेम्पो चढविला. या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची फिर्याद सुनील गवस यांनी दोडामार्ग पोलिस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार संशयित आरोपी सुरेश पवार (वय २०) रहाणार तिलारी नगर, ता. चंदगड याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतल्याची माहिती दोडामार्ग पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.
कसा अपघात घडला ?
मयत श्रीया गवस हिच्या अपघाती मृत्यू नंतर तिचे काका सुनील गवस यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपली भावजय सौ. स्वरुपा ही तिच्या सात वर्षाच्या मुलीला श्रीया ला सोबत घेऊन माहेरी देवाच्या जत्रोत्सवाला गेली होती. झरेबांबार गाववात तिचे माहेर आहे. झरेबांबर गावच्या देवीचा गुरुवारी जत्रोत्सव होता. देवाच्या दर्शनासाठी माय-लेक दोघेही गेली होती. जत्रोत्सवाच्या दुसऱ्यादिवशी शुक्रवारी ती पुन्हा तिच्या मुलीला घेऊन सासरी मांगेली देऊळवाडी येथे यायला निघाली. बस पकडण्यासाठी ती झरेबांबार तिठा येथे बस थांबावर आली होती. हा बस थांबा दोडामार्ग तिलारी राज्यार्गावर आहे. येथे वाहनांची बरीच वर्दळ असते. ती आपल्या मुली समवेत रस्त्यालगत एस.टी.बस ची वाट पाहत थांबली होती. त्याच वेळी घाट माथ्यावरून भाजी वाहतूक करणारा ४०७ टेम्पो (नं. एम. एच. ०९ सियू ७९४९ ) भरधाव वेगात दोडामार्गच्या दिशेने जात होता. सुरेश पुंडलिक पवार (वय २० ) टेम्पो चालवत होता. चालक सुरेश याने भरधाव टेम्पोची धडक रस्त्यालगत उभ्या असलेल्या आपल्या सात वर्षाच्या पुतणीला दिली. धडक बसताच ती बालिका चार ते पाच फूट लांब रस्त्यावर उसळून पडली. ती रस्त्यावर पडली असताना चालक सुरेश पवार याने तिच्या अंगावरून टेम्पो चढविला. टेम्पोचे चाक तिच्या मानेवरून व डोक्यावरून गेल्याने तिला जबर मार लागला. आणि, या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात नोंदविली आहे.
चालकावर गुन्हा
मयत श्रीया गवस हिच्या काकांनी सुनील गवस यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार चालक सुरेश पवार याने रस्त्याचे विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून व हयगईने, अविचाराने भरधाव वेगात टेम्पो चालवून फिर्यादी यांची पुतणी श्रीया हिला धडक दिली. यात तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यूस झाला. तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालक सुरेश याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. नाईक करीत आहेत.