अनधिकृत वाळू उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीचा अपघात

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: April 10, 2026 00:08 AM
views 31  views

मालवण : अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाहतूकीवर कारवाईसाठी प्रांताधिकारी आल्या असताना बांदिवडे येथून त्या माघारी कुडाळ येथे जात असता बुधवारी रात्री दीड वाजण्याचे सुमारास गोळवण कुमामे येथील रस्त्यावर त्यांची गाडी रस्ता सोडून उलटल्याने अपघात झाला. या अपघतात प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्यासह इतर कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.


बांदिवडे परिसरात रात्रीच्यावेळी गस्त घालताना हा अपघात झाला. बांदिवडे परिसरात गस्त घालून बुधवारी रात्री उशिरा कुडाळ येथे जाण्यासाठी निघाल्या असता त्यांची गाडी क्रमांक (MH 07 G 2197) ही गोळवण सोडून कुमामे भागात गवस घरानजीक उतारावर चालक लाडू सीताराम शेडगे यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दहा फूट खोल रस्त्यालगतच्या भागात कोसळली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी अपघाताचा आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली व प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांना खासगी वाहनातून कुडाळ येथे पाठवले. अपघातावेळी गाडीत प्रांताअधिकारी, चालक, तसेच प्रांत कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. मात्र, सुदैवाने त्यापैकी कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. याप्रकरणी पोलिसात माहिती देण्यात आली असून पंचनामा करण्यात आलेला आहे. रात्री उशिरा अपघात झाल्याने गाडी त्याच ठिकाणी ठेवण्यात आली होती. जखमींना दुसऱ्या गाडीतून कुडाळ येथे हलविण्यात आले होते. 


अपघाताची खबर मिळताच कट्टा पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला, हेड कॉन्स्टेबल प्रकाश मोरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी प्रांत कार्यालयातील अधिकारी शिंदे, मंडळ अधिकारी संतोष गुरखे, मंडळ अधिकारी डी. वी. शिंगरे, अजय परब, पीटर लोबो, दीपक शिंदे, श्री अलकुटे, गौरी कोकरे, गुरव, मालवण तलाठी गौरव दळवी, अनिकेत कासले, श्रीधर नाईक, संतोष नाईक, स्वप्निल साळकर, योगेश वेंगुर्लेकर, सचिन चव्हाण, बाबू चव्हाण या महसूल कर्मचाऱ्यासहित गोळवण सरपंच शरद मांजरेकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रियांका मनवर, पोलीस पाटील राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी गोळवण कुमामे ग्रामस्थांतर्फे दादा मिठबावकर, विनित भोजने, राजेंद्र थवी व ग्रामस्थांनी अपघात मदत केली.