
कुडाळ : कुडाळ बाजारपेठेत मध्यरात्रीच्या सुमारास एका भरधाव बॅलेनो कारने भीषण धुमाकूळ घातला. या अपघातात बाजारपेठेतील स्टॉल्स, उभी वाहने आणि एका एटीएम केंद्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने, ही घटना मध्यरात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास कुडाळ बाजारपेठेतून जाणारी एक बॅलेनो कार चालकाचे थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये शिरली. ही धडक इतकी जोरदार होती की, रस्त्यावरील स्टॉल अक्षरशः चिरडले गेले. एवढेच नव्हे तर, कारने एका एटीएम (ATM) सेंटरलाही जोराची धडक दिली, ज्यामुळे केंद्राचे आणि मशीनचे नुकसान झाले आहे.
दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली
कुडाळ बाजारपेठ ही नेहमीच गजबजलेली असते. मात्र, हा अपघात मध्यरात्री झाला जेव्हा लोकांची वर्दळ पूर्णपणे थांबली होती. जर हीच घटना दिवसा घडली असती, तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असती, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे. या धडकेत स्टॉल धारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रोजगाराचे साधन असलेल्या या स्टॉल्सचे नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच तिथे उभ्या असलेल्या इतर वाहनांनाही या कारने धडक दिल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे.
अपघातानंतर कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. कार चालक कोण होता? चालकाने मद्यपान केले होते का ? गाडीचा वेग किती होता? या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या कुडाळ शहरात या अपघाताबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघाताची वेगवेगळे अनुमान लावले जात आहेत.










