
दोडामार्ग : पर्यटनासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या कारला दोडामार्ग केळीचे टेंब येथे अपघात झाल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप असून कारचे मात्र नुकसान झाले आहे. ख्रिसमस (नाताळ) सणासह सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशातील विविध राज्यांतून पर्यटक गोवा राज्यात दाखल होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी बेंगलोर येथील काही पर्यटक गोव्याकडे जात असताना त्यांच्या कारला किरकोळ अपघात घडला.
बेंगलोर (कर्नाटक) येथील हे पर्यटक शुक्रवारी रात्री बेळगाव येथे मुक्काम करून सकाळी कारने दोडामार्ग मार्गे गोव्याच्या दिशेने निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांनी साटेली-भेडशी येथे चहासाठी थांबा घेतला. पुढे दोडामार्ग नजीक आले असताना कारमधील चार वर्षांची मुलगी पुढील सीटवर बसलेल्या वडिलांकडे येण्यासाठी धडपड करत होती. यावेळी चालकाचे काही क्षणांसाठी लक्ष विचलित झाले आणि कार रस्ता सोडून बाजूला घळणीत गेली. सुदैवाने तेथील झाडावर आदळण्यापासून कार थोडक्यात बचावली व मोठा अनर्थ टळला.










