चालत जाताना भरधाव दुचाकीची ठोकर

उपचारासाठी नेताना मृत्यू
Edited by: दिपेश परब
Published on: October 03, 2024 15:30 PM
views 266  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरातील दाडाचेटेंब येथे रहाणारे नारायण रामा पालयेकर (७६) हे काल बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास पॉवरहाऊस नाका येथून आपल्या घरी चालत जात असताना भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने ठोकरले. या अपघातात गंभीर जख्मी झालेले नारायण पालयेकर यांचा अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे नेत असताना वाटेतच निधन झाले. या अपघात प्रकरणी वाहन हयगयीने व अविचाराने आणि रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवत नारायण पालयेकर यांच्या गंभीर दुखापतीसह मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालक पुंडलिक कृष्णा हळदणकर यांचेवर गुन्हा दाखल झाला आहे.


काल बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारांस दाडाचेटेंब येथे रहाणारे नारायण रामा पालयेकर हे कॅम्पकॉर्नर नाका येथून चालत आपल्या घरी जात होते. कांही अंतरावर वेंगुर्ले ते तुळस जाणारे रस्त्यावर रामघाट रोड दाडाचेटेंब म्हाडा कॉलनी बाजुच्या डांबरी रस्त्यावर डाव्याबाजूला असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांना ठोकरले. या अपघातात नारायण पालयेकर हे रस्त्याच्या डाव्या बाजूस पडले होते. या अपघाताचा आवाज ऐंकून कॅम्पकॉर्नर तिठा भागातील नागरीक धावत अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी पोलीसांना या अपघाताची खबर देत गंभीर जख्मी रूग्णांस तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात नेण्यासाठी प - यत्न केले. त्यांचा अपघात झाल्याचे कळताच कॅम्प कॉर्नर परीसरातील नागरीकांनी रूग्णालयात धाव घेतली. वेंगुर्ले उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर्सनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा- बांबुळी रूग्णालयात रेफर केले.

त्यानुसार नारायण पालयेकर यांना गोवा-बांबुळी रूग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले. वेंगुर्ले पोलीसांना अपघातातील पल्सर दुचाकी वाहन क्र.MH-07-L-४१४१ हे वाहन ताब्यात घेतले आहे.

या अपघात प्रकरणी दुचाकी चालक पुंडलिक कृष्णा हळदणकर याचेवर वाहन हयगयीने व अविचाराने आणि रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवत नारायण पालयेकर यांच्या गंभीर दुखापतीसह मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम १०६(१), १२५ (अ), १२५ (बी), २८१ व मोटार व्हेईकल अॅक्ट १८४ अन्वये गुन्हा पोलीसांत दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड करत आहेत.