गांधी चौकात धडाडल्या अभाविपच्या थोफा !

युवाशक्तीला कोणीही रोखू शकत नाही : शिवांगी खरवाल
Edited by: विनायक गांवस
Published on: December 28, 2024 20:35 PM
views 76  views

सावंतवाडी : 'राष्ट्र प्रथम 'हा मंत्र जपत युवकांमध्ये राष्ट्रधर्माचे पालन करण्याची शिकवण अभाविप संघटनेच्या माध्यमातून दिली जाते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असून या संघटनेचे विद्यार्थी ३६५ दिवस काम करीत असतात. आजचा युवक हा देशाची दशा व दिशा बदलण्याचे काम करु शकतो. २०४७ मध्ये भारत देशाला जगातील एक नंबरचा देश बनविण्याचं काम हीच युवाशक्ती करेल असा विश्वास राष्ट्रीय मंत्री शिवांगी खरवाल यांनी व्यक्त केला. सावंतवाडी गांधी चौकातील जाहीर सभेत त्या बोलत होत्या.     

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने सावंतवाडी येथे आयोजित ५९ व्या कोकण प्रांत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी गांधी चौक येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना राष्ट्रीय मंत्री शिवांगी खरवाल यांनी उपस्थित युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची चेतना जागृत केली. यावेळी व्यासपीठावर प्रांत अध्यक्ष प्रा.श्रीकांत दुदगीकर,प्रांत मंत्री राहुल रजोरीआ, वैष्णव देशमुख, गौरीदेवी गुप्ता, ऋषिकेश काळे, विनय राऊत, प्रशांत नाईक, व्यवस्था प्रमुख चिन्मयी प्रभू खानोलकर आदी उपस्थित होते. 

शिवांगी खरवाल म्हणाल्या,देशात नक्षलवादी व घुसखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 'ऑपरेशन पिन कोड ' च्या माध्यमातून हे लोक घुसखोरी करीत आहेत. त्याला रोखणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण या घुसखोरांमुळे आपले अधिकार व आपल्या सुविधा यावर गदा येत आहे. हे असेच सुरू राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागतील. त्यामुळे डिटेक्ट म्हणजे शोधा, डिलीट म्हणजेच त्यांचे मतदान कार्ड व अन्य सुविधा नष्ट करा व डिपोर्ट म्हणजेच त्यांना त्यांच्या देशात परत पाठवा या 'तीन डी' चा वापर करून आपल्या देशाला सुरक्षित करण्याचे काम माझ्यासमोर बसलेली ही प्रचंड युवाशक्ती करू शकते त्याचा मला निश्चितच विश्वास आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ज्याप्रमाणे आमच्या शेजारी राष्ट्र असलेल्या बांगलादेशात तेथील आया-बहिणीचे शोषण होत आहे ते पाहून फार दुःख होत आहे.  तेथील परिवारांना हे माहीत नाही की सकाळी घरातून बाहेर पडलेली त्यांची माता बहीण किंवा मुलगी संध्याकाळी सुरक्षितपणे घरी परतेल की नाही  एवढा अत्याचार त्या ठिकाणी हिंदूवर सुरू आहे. हा फार मोठा चिंतेचा विषय आहे कारण आज जर आम्ही गप्प आहोत. महिला सुरक्षेच्या गप्पा मारणाऱ्या संघटना व पक्ष या विषयावर मात्र मूग गिळून गप्प आहेत. स्वामी विवेकानंद म्हणाले होते उठा जागे व्हा व तोपर्यंत लढा जोपर्यंत लक्ष गाठत नाही. आम्हाला जाग व्हायलाच हवं तोपर्यंत हा लाडात द्यायला हवा की जोपर्यंत बांगलादेशात शिल्लक राहिलेल्या १५ टक्के हिंदूंना न्याय मिळत नाही. आपल्या युवाशक्तीला कोणीही रोखू शकत नाही कारण अशी कोणतीही ताकद नाही की जी अभावीपची ताकद रोखू शकते, असा एल्गार त्यांनी यावेळी केला. ज्या पद्धतीने २०१८ साली या महाराष्ट्रात 'मिशन साहसी ' सारख्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यातून हे मिशन पूर्ण देशात आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करीत आहे. देशातील १५ लाख विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे या मिशनच्या माध्यमातून दिले जात आहेत. एकीकडे अभावीप सारखी संघटना अशाप्रकारे विद्यार्थी घडवत असताना तामिळनाडूतील एक नेता मात्र महिलांचे शोषण करीत आहे. तो दिवस दूर नाही की त्यांची खुर्ची अभावीप खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. स्वतःच्या भविष्यासाठी दिवसाचे आठ ते बारा तास स्वतःला खोलीत कोंडून घेऊन रात्रंदिवस अभ्यास करणारी आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपल्याला आपल्या संघटनेच्या माध्यमातून करायचे आहे. पेपर फुटीच्या घटनेवेळी सर्वात प्रथम अखिल भारतीय विद्यार्थी सेनेनेच आवाज उठविला होता. त्यामुळे प्रशासनाला पुन्हा परीक्षा घेणे भाग पडले होते. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या उत्कर्षासाठी व संघर्षासाठी आपण नेहमी तत्पर राहायला हवे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

या सभेस संबोधित करताना वैष्णव देशमुख म्हणाले, जातीवाद, प्रांतवादाला बळी न पडता आपण एक राहण आवश्यक आहे. भारत विरोधी संघटना असे वाद निर्माण करण्याचे प्रकार घडत आहेत. गौरीदेवी गुप्ता यांनी मनोगत व्यक्त केले. महिला अत्याचारांसह महिलांच्या रक्षणावर भाष्य केलं.देशाला संघटीत करायचं काम आपणाला करायचेय असं मत

ऋषिकेश काळे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांची ताकद ही राष्ट्राची ताकद असल्याचे मत प्रशांत नाईक यांनी व्यक्त केले.चिन्मयी खानोलकर म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा निर्माण कराव्या. कोकणातील जमीनी विकल्या जाऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यावी असं विधान केले.राहुल रजोरीआ म्हणाले, तंत्रज्ञान जेवढं चांगलं आहे तेवढंच ते धोकादायक आहे‌. प्रांत अध्यक्ष प्रा.श्रीकांत दुदगीकर यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर, कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी,  प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई, अन्नपूर्णा कोरगावकर, अवधूत देवधर आदींसह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.