
सावंतवाडी : कोकणाला निसर्गाने भरभरून दिलं असलं तरी कोकणी माणसाच्या पदरात मात्र ते कधी पडल नाही. भविष्यात पर्यटनापासून फळप्रक्रिया, सागरी उद्योगपासून ते आयटी पार्कपर्यंत अनेक उद्योग सामावून घेण्याची क्षमता कोकणात आहे. असे प्रकल्प उभे राहत असताना विकासप्रक्रियेत कोकणी माणसाने आघाडीवर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार भानूशे यांनी आज येथे केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोकण प्रांत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ''समृद्ध कोकण, विकसित कोकण'' या विषयावर परिसंवादात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, युवराज लखमराजे भोसले, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, मोहन होडावडेकर, प्रसाद पारकर, बाबा मोंडकर, विजय केनवडेकर, संजू कर्पे, सतीश पाटणकर, जयवंत विचारे, संतोष राणे यांच्यासमवेत तज्ञ मंडळी या परिसंवादात सहभागी झाले होते. या परिसंवादातून निघणारे सार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 51 व्या कोकण अधिवेशनस जमणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसमोर मांडले जाणार आहे. यातून भविष्यातील विकसित कोकणात विद्यार्थी आपापले योगदान देऊ शकतील हा यामागचा उद्देश आहे.
श्री भानुसे पुढे म्हणाले, कोकणपट्ट्याला गेल्या काही वर्षांपासून विकासाचे वेध लागले आहेत. निसर्गसौंदर्य ओतप्रोत भरलेलं आहेच.पण, फळा-फुलांच्या बाबतीतही समृद्ध असलेल्या कोकणच्या विकासाचा ध्यास अनेकांनी घेतला आहे. त्यातूनच कोकणच्या विकासाचा एक-एक पैलू पडत आहे. कोकणातली ही श्रीमंती केवळ देशभरातच नाही तर जगाच्या नकाशापर्यंत नेण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू असतात. स्थानिक उत्पादनावर प्रक्रीया करून त्यापासून विविध पदार्थ बनविण्यासाठी स्थानिकांना मार्गदर्शन व वित्तीय पुरवठा केला पाहीजे.पर्यटनसाठी चांगले रस्ते बनविले पाहिजेत त्यांची देखभाल वेळेवर केली पाहीजे, मार्गदर्शन फलक रस्त्यावर असले पाहिजेत. कोकणातील काही पर्यटन स्थळांचा विकास करताना विकासाचे जे नियम आहेत ते पाळून विकास कामे केली पाहिजेत. तसेच
कृषि पर्यटनाला योग्य असलेली जागा, शेतकरी याना हेरून त्यांना प्रशिक्षित करून कृषि आराखडा तयार करून त्याप्रमाणे कार्यवाही केली पाहीजे.ऐतिहासिक स्थळे आज जरी दुर्लक्षीत असली तरी ती सुस्थितीत ठेवण्यासाठी स्थानिकांचा सहभाग घेऊन ते काम शासनाने केले पाहीजे. पुढे त्याचा पर्यटनासाठी फायदा होणार आहे.भौगोलिक दृष्ट्या कोकणाची रचना वेगळी आहे पण पर्यटनाला पूरक आहे त्यामुळे कोकणसाठी शासनाने विशेष प्रयत्न करून कोकणी जनतेला विकासाच्या दिशेने नेले पाहीजे.शासनाकडून भरपूर अपेक्षा आहेत पण आपण स्थानिक काय करू शकतो याचा आढावा घेणे आवश्यक आहे. कोकणाच्या विकासासाठी अशाप्रकारे परिसंवादाचे आयोजन केल्याने त्याच्या मोठ्या प्रमाणात विकासाला फायदा होणार आहे त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम कौतुकास्पद आहे असेही त्यांनी सांगितले.
कोकण अनेक बाबींनी समृद्ध आहे, तो विकसित करण्याची आज नितांत गरज आहे. आजच्या संगणकीय युगात मानवाने सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. जग विलक्षण वेगाने प्रगती करीत आहे. अशा वेळेत कोकणाने कात टाकून जगाच्या स्पर्धेत उतरले पाहिजे. इथल्या तरुणतरूणींनी विकासाची स्वप्ने पहावयास हवी. विद्यार्थी दशेमध्ये त्यांना उद्योग आणि व्यवसायाचे महत्व कळावयास हवे. दरवर्षी नोकरीच्या निमित्ताने कोकण सोडणारा तरुण हा चिंतेचा विषय आहे. यासाठी इथं रोजगार आणि व्यवसायाच्या प्रचंड संधी असणाऱ्या सर्वच क्षेत्रांचा गांर्भियाने विचार करावयास हवा. पर्यटनाची विविध क्षेत्र, मत्स, फळफळावळ, शेती आणि त्यावर आधारीत प्रक्रिया उद्योगांची सद्य स्थिती काय आहे, त्यांना कोणत्या सुविधा हव्यात, भविष्यात या उद्योगांपुढे कोणती आव्हाने असणार आहेत, अशा बाबींवर चर्चा झाली आहे या बाबतीत सरकारी धोरणांत कोणते बदल अपेक्षित आहेत आणि त्या करीता आपल्याला काय करावयास हवे या करीता काही धोरणात्मक पाऊले उचलण्याची गरज आहे.
या करीताच तज्ञ मंडळींना या खुल्या परिसंवादास निमंत्रित करून आपण आपल्या क्षेत्रातील कामाचा अनुभव आणि अडचणी या बाबत विचार मांडावयाचे आहेत. या परिसंवादातून निघणारे सार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५१ व्या कोंकण प्रांत अधिवेशनास जमणाऱ्या हजारो विद्याथ्यांसमोर मांडले जाणार आहे. भविष्यातील विकसित कोकणात विद्यार्थी आपआपले योगदान देऊ शकतील. या कार्यक्रमात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी मार्गदर्शन केले तर प्रास्ताविक अतुल काळसेकर आणि विजय केनवडेकर यांनी केले.