
सावंतवाडी : परिषदेच्या घोषणा या फक्त घोषणा नाहीत. त्यामागे एक बलिदान, इतिहास आहे. देशानं आपल्याला दिलं आहे. आपण, देशाचं देणं लागतो ही शिकवण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिली आहे. ही संघटना अभावि नाही तर देशातील प्रभावी संघटना असल्याचे विधान कोकण प्रांत संघटन मंत्री निरज चौधरकर यांनी केले. विद्यार्थी परिषदेशी तुलना करावी अस कोणतंही विद्यार्थी संघटन नाही. राष्ट्र भक्ती शिकवणारी ही परिषद असल्याचे श्री. चौधरकर यांनी सांगितले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोंकण प्रांत अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. समारोपप्रसंगी माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अधिवेशनास भेट दिली.
निरज चौधरकर म्हणाले, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनाचा आज समारोप होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच अधिवेशन पार पडल. विकसित कोकण, समृद्ध कोकण ही संकल्पना या अधिवेशनाची होती. विकासाची परिभाषा यातून जाणून घेतली गेली. आज इतरत्र इयर एंडच्या पार्ट्या होताना आपण अधिवेशनात धडे घेत आहात. त्याग करून योगदान देणं हे अभाविपतच घडत अस विधान श्री. चौधरकर यांनी केल. तसेच समाजात परिवर्तन करण्यासाठी आम्हाला कष्ट घ्यावे लागणार आहेत. घराघरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्याच काम परिषदेन केलं. आंदोलन म्हणजे फक्त जाळपोळ, तोडफोड नाही. मनातल्या विचारांना चालना देण्याच काम विद्यार्थी परिषद करते. अशाच प्रकारच्या आंदोलनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच नाव विद्यापीठाला देण्यास भाग पाडलं असं मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर प्रांत अध्यक्ष प्रा.श्रीकांत दुदगीकर, प्रांत मंत्री राहुल राजोरिआ आदी उपस्थित होते. दरम्यान, माजी शिक्षणमंत्री आम. दीपक केसरकर यांनी समारोप कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष मंगल भानुशे यांच्या हस्ते श्री.केसरकर यांचा सन्मान करण्यात आला. वंदे मातरम् ने अधिवेशन समाप्त झाले