चिपळूणचे अभिषेक गांधींचे ऑस्ट्रेलियामध्ये ए. आय. परीक्षेत यश..

Edited by: मनोज पवार
Published on: September 13, 2024 13:47 PM
views 285  views

चिपळूण : येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी चिपळूणचे विद्यमान अध्यक्ष व नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे माजी संचालक, चिपळूण अर्बन बँकेचे माजी चेअरमन आणि चिपळूण तालुका इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष  उदय गांधी  यांचे सुपुत्र अभिषेक गांधी यांनी ऑस्ट्रेलिया येथील ऍडलेट विद्यापीठातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमध्ये मास्टर्स ही पदवी विशेष प्रावीण्यासह नुकतीच संपादित केली आहे. त्यांनी मिळवलेल्या नेत्रदीपक यशामुळे त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

अभिषेक याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूल, तसेच उच्च माध्यमिक शिक्षण ज्ञानदीप विद्यामंदिर बोरज खेड, तदनंतर बी.एस.सी.पर्यंत रुहिया महाविद्यालय माटुंगा, मुंबई आणि एम. एस. सी. ही पदवी स्टॅटिस्टिक्स या विषयात मुंबई विद्यापीठातून संपादित केलेली आहे. अभिषेकने त्यानंतर एल. अँड. टी. इन्फोटेक बंगलोर येथे डाटा सायंटिस्ट म्हणून दोन वर्षे आपल्या कामाची चुणूक दाखवली असून त्यानंतर नुकतीच ऑस्ट्रेलिया येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मास्टर्स ही पदवी मिळवलेली आहे. अद्यापपर्यंत सर्वच परीक्षांमध्ये अभिषेक विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला असून शिक्षणाबरोबरच त्याला ट्रेकिंगची विशेष आवड आहे. अभिषेकने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल चिपळूणकरांसह अनेक मान्यवरांनी आणि कोकणवासियांनी अभिषेक वडील उदय गांधी, आई सौ.अनघा गांधी यांचे अभिनंदन केले आहे.