
चिपळूण : माणसाच्या जीवनावर आकाशातील ग्रह काही प्रभाव करीत नाही, तर माणसाच्या मनातील ग्रह, जसे आग्रह ,विग्रह, दुराग्रह, अनुग्रह , संग्रह, पूर्वग्रह हे मात्र नक्कीच प्रभाव करतात. असे वक्तव्य पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी केले. विद्या प्रसारक मंडळ ठाणे संचलित, गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या नाना फडणवीस सभागृहात, आकाशातील रहस्य या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते.
ते पुढे म्हणाले, विश्वात निसर्गात घडणाऱ्या आश्चर्यकारक घटना घडतात. त्यांची उकल केल्यानंतर वस्तुस्थिती कळते, हाच वैज्ञानिक दृष्टिकोन. आकाश हे उघडे पुस्तक आहे. आकाश विनामूल्य आहे. जेथे जाऊ तेथे उपलब्ध आहे. आकाश वाचायला प्रकाश लागत नाही ते काळोखात वाचायचे असते. ते पुढे म्हणाले, पक्षी, प्राणी, वनस्पती हे आदी विश्व १३.७ अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यातून पोकळी, वस्तू आणि वेळ (टाईम या तीन गोष्टी निर्माण झाल्या. तेव्हापासून वेळ (टाईम) मोजला जाऊ लागला. हे विश्व अनंत आहे. या विश्वात अब्जावधी आकाशगंगा आहेत. एका एका आकाशगंगेत अब्जावधी सूर्यमाला आहेत. त्या प्रत्येक सूर्यमालेत तारे , पृथ्वीसारखे ग्रह, त्या पृथ्वीवर आपले छोटेसे गाव आणि आपण म्हणजे वाळूचा एका कणाचे लक्षावधी कण केल्यास, त्यातील एक कणही मोठा असेल.एवढे आपण विश्वापुढे नगण्य आहोत. पण आपण स्वतःला फार मोठे समजत असतो. खगोल शास्त्रातील रहस्ये समजावुन घेतली तर विश्वाच्या दृष्टीने आपले स्थान लक्षात येते.
आकाशातील ग्रह ताऱ्यांचे पृथ्वीपासून अंतर विशद करताना , चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ८४ हजार कि.मी. अंतरावर आहे. आणि समुद्राच्या भरती ओहोटीमुळे तो दरवर्षी ३.८ सेमी दुर जात आहे. तो परत कधीही जवळ येणार नसल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. सुर्य १५ कोटी किमी अंतरावर आहे. सुर्यापासून निघालेला किरण पृथ्वीवर पोहचायला ८.५० मिनिटे लागतात. हे अंतर मोजणे कठीण असल्याने प्रकाश वर्षांत सांगतात. सुर्य पृथ्वीपासून जवळ असल्यामुळे आपल्याला प्रकाश- उर्जा मिळते. चित्र तारा- ४ प्रकाशवर्ष, व्याध तारा - ९ प्रकाशवर्ष, रोहिणी तारका-६८ प्रकाशवर्ष, आपल्या आकाशगंगेच्या जवळची एन्ड्रोमेडा (गॅलॅक्सी) २५ लक्ष प्रकाशवर्ष अंतरावर आहे. आपली आकाशगंगा एवढी मोठी आहे की, तिच्या एका टोकापासून निघालेला प्रकाश किरण दुसर्या टोकापर्यंत पोहोचायला १ लक्ष १० हजार वर्ष लागतात. सूर्यावरील हायड्रोजन चे रुपांतर हेलियम मध्ये होते म्हणून तो प्रकाश देतो आणि आपल्याला उर्जा मिळते, सूर्यावरील हायड्रोजन अजून ५ अब्ज वर्षे पुरुष शकेल, असे शास्त्रज्ञांनी मांडले आहे. १ सेकंदाला ६३ कोटी टन हायड्रोजनचे रुपांतर हेलियममध्ये होते. म्हणजेच सुर्य धगधगते यज्ञ कुंड आहे.
याबरोबरच खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी आकाशातील चंद्र, ग्रह, ग्रहण , धुमकेतू, त्यामुळे तयार झालेले महाराष्ट्र बुलढाणा लोणार अश्णी विवर उल्कावर्षाव, कृष्णविवर आदिची विस्तृत माहिती दिली.
या कार्यक्रमास विद्या प्रसारक मंडळ ठाणेचे कार्याध्यक्ष डॉ.विजय बेडेकर, सेक्रेटरी अभय मराठे, महर्षि परशुराम इंजिनिअरींग कॉलेज वेळणेश्वरचे प्राचार्य अविनाश पवार, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबईचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. सुधाकर आगरकर आदी उपस्थित होते.