रूग्णांचा 'आधार' सिंधुमित्र सेवा प्रतिष्ठान...!

Edited by: विनायाक गावस
Published on: July 01, 2023 11:51 AM
views 316  views

रूग्णसेवा ही खरी ईश्वरसेवा आहे. याच भावनेनं सावंतवाडीत एक संस्था कार्यरत आहेत. वेळ अन् काळ न पाहता ही संस्था गरजूंच्या मदतीला धावून जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूऱ्या आरोग्य सुविधा, उपचारासाठी इतर राज्यावरील अवलंबता विचारात घेऊन जिल्ह्यातील गरजू रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने "डॉ. डी. बी. खानोलकर रुग्णसेवा केंद्र" सुरू केले आहे. सबनीसवाडा एकमुखी दत्त मंदिर शेजारी असणार हे केंद्र  गेली अनेक वर्षे सावंतवाडीतील रूग्णांच आधार म्हणून उभं राहिलं आहे. दिवस असो वा रात्र किंवा अगदी मध्यरात्र हे रुग्णसेवा केंद्र प्रतिष्ठानचे सदस्य गोरगरीब जनतेसह अडलेल्यांच्या मदतीसाठी देवासारखे धावून येतात. त्यामुळेच हे केंद्र सर्वांसाठी आधार देणारं केंद्र ठरलं आहे.

सिंधुमित्र सेवा प्रतिष्ठानच्या अनेक उपक्रमांपैकी हा एक आदर्शवत व प्रेरणादायी असा उपक्रम आहे. केवळ दिखाव्यासाठी नाही तर प्रत्यक्ष रूग्णसेवेसाठी ही मंडळी अहोरात्र मेहनत घेते. गंभीर अपघाताच्यावेळी फ्रॅक्चर झाल्यानंतर, पॅरलाईस अॅटॅक अथवा वृद्धापकाळात रुग्ण अंथरुणाला खिळलेला असतो अशावेळी फाऊलर बेड, व्हील चेअर, कमोड चेअर, वॉकर, कमोड चेअर (चाकासाहित), नेब्युलाईझर अशा अनेक वैद्यकीय साहित्याची काही कालावधीसाठी गरज असते. मात्र, आधीच रुग्णावर झालेला खर्च कुटुंबाला असह्य असतो. त्यामुळे रुग्ण घरी आल्यानंतर त्याला रुग्णालयासारख्या किमान सुविधा घरीच उपलब्ध व्हाव्यात कुटुंबियांना रुग्णाची सेवासुश्रुषा करणं सोपं व्हावं या उद्देशाने 'वापरा व परत करा' या तत्वावर सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे हे रुग्णसेवा केंद्र आपली सेवा देत आहे. २०१८ पासून सुरु असलेल्या केंद्राच्या उपलब्ध सेवेचा लाभ जिल्ह्यासह गोव्यातील शेकडो गरजू घेत आहेत. सावंतवाडी येथील कै. डॉ. डी. बी. खानोलकर यांनी आपल्या कुटुंबासह व्यक्तिगत जीवन जगताना आयुष्यभर बांदा येथे बांदा व परिसरातील रुग्णांची सेवा केली. रोजच्या उत्पन्नाचे ते तीन भाग करत. एक भाग क्लिनिकच्या खर्चासाठी, एक भाग स्वतःच्या संसारासाठी व एक भाग समाजासाठी. या निःस्वार्थी समाजसेवकाचे कार्य चिरंतर राहण्यासाठी तसेच आजच्या पिढीसमोर त्यांचा आदर्श राहण्यासाठीच या रुग्ण सेवा केंद्राला कै. डॉ.डी. बी. खानोलकर रुग्णसेवा केंद्र हे नाव देण्यात आले. सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा येथील एकमुखी दत्त मंदिराजवळ उकीडवे यांच्या सुशिला अपार्टमेंटमध्ये हे रूग्णसेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. २०१८ पासून गेली पाच वर्षे हे रूग्ण सेवा केंद्र गरजूंना सेवा देत आहे. यासाठी सुनील उकीडवे यांच्यासह या इमारतीमधील सर्व रहिवाशांचे सहकार्य लाभते. या रुग्णसेवा केंद्राची जबाबदारी सिंधुमित्र प्रतिष्ठानने आनंद मेस्त्री, अँड्र्यू फर्नांडिस व केदार बांदेकर या तिघांवर दिली असुन सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून ते गरजूंना सेवा देत आहेत. गरजूंना जेव्हा दिवसा व रात्री या केंद्रातील साहित्याची गरज असते तेव्हा सिंधुमित्र प्रतिष्ठानचे हे कार्यकर्ते निःस्वार्थ भावनेने या केंद्राची सेवा देण्यासाठी तत्पर असतात. आनंद मेस्त्री हे व्यवसायाने रिक्षाचालक, अँड्र्यू फर्नांडिस हे सुतार आहेत तर केदार बांदेकरांचा शेतकी व्यवसाय आहे. हे तिघेही यासाठी आपला वेळ देतातच शिवाय गरजुंच्या एका कॉलवर आपले काम सोडुन तत्पर सेवा देत आहेत.

जिल्ह्यातील अनेकजण नोकरी व  व्यवसायानिमित्त देश-विदेशात आहेत. अनेक जवान सीमेवर देशाच्या रक्षणासाठी कार्यरत आहेत. हे सर्वदूर असताना त्यांच्या निकटवर्तीयाचे जेव्हा दुःखद निधन होतं तेव्हा त्यांना किमान अंत्यदर्शनास पोहचण्यासाठीची इच्छा असते. मात्र, अंत्यसंस्कारासाठी भौगोलिकदृष्ट्या अंतर व दळणवळणाच्या दृष्टीने त्यांना तात्काळ गावी येणे अडचणीचे ठरते. ते अंत्यविधीसाठी उपस्थित राहू शकत नाही. ही सल आयुष्यभर त्यांच्या मनात राहते. याचं भान ठेवत सिंधुमित्र प्रतिष्ठानने या रुग्णसेवा केंद्रात 'शितशवपेटी' अर्थात डेड बॉडी फ्रीझर गरजूंसाठी मोफत उपलब्ध केला आले. या सुविधेचा अनेकजण लाभ घेत आहेत. काळवेळ न पाहता सेवाभावी वृत्तीने हे प्रतिष्ठान कार्यरत आहे.

सिंधुमित्र प्रतिष्ठान स्थापनेपासुनच जनसामान्यांच्या सेवेचे व्रत जोपासत आहे. शिक्षण, जनजागरण, पर्यावरण यासह समाजाच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्याचा सेवाभावी वृत्तीने प्रयत्न करत आहे. प्रतिष्ठानने आरोग्यसेवेत फक्त निःशुल्क शिबिरे, रक्त तपासणी, निःशुल्क औषध पुरवठा, चष्मा वाटप यापुरतेच आपले कार्य मर्यादित न ठेवता अपघातात गंभीर जखमी होऊन घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांची देखील सेवा घडावी या उद्देशाने "डॉ डी बी खानोलकर रुग्णसेवा केंद्र" सुरू केले आहे. आतापर्यंत  शेकडो रुग्णांनी याचा लाभ घेतलाच शिवाय या केंद्रात उपलब्ध असलेली 'शितशव पेटी' शेकडो गरजूंना उपयोगी ठरली आहे. आमच्या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या केंद्राचे सेवेकरी आनंद मेस्त्री,अँड्र्यू फर्नांडिस, केदार बांदेकर अहोरात्र सेवा देत आहेत. याचा आम्हाला अभिमान असुन भविष्यातही आमचे प्रतिष्ठान ही सेवा जास्तीतजास्त गरजूंना देणार आहे. त्यामुळे या केंद्राचा गरजूंनी लाभ घ्यावा   

डॉ. प्रविणकुमार ठाकरे, अध्यक्ष, सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान

सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून आमचा प्रतिष्ठानच्या सर्व उपक्रमात सक्रिय सहभागी असतो. २०१८ साली आम्ही सर्व सिंधुमित्रांनी रुग्ण सेवा केंद्र सुरू करण्याचे ठरविले. सुरवातीपासूनच आम्हावर  प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे सरांनी डॉ. डी. बी. खानोलकर रुग्णसेवा केंद्राची जबाबदारी आमच्यावर सोपवली. या माध्यमातुन गेली पाच वर्षे आम्ही आमचा व्यवसाय सांभाळून गरजूंना दिवसा तसेच रात्री ही सेवा देतो. रुग्ण सेवा केंद्राच्या सेवेचा लाभ घेतलेल्या व्यक्ती जेव्हा आशीर्वादपर भावना व्यक्त करतात तेव्हा समाजाच्या गरजेस थोडे का होईना आम्ही उपयोगी पडतो याचे आम्हाला समाधान मिळते. यासाठी आम्हाला अनेकवेळा आमचे सहकारी केदार बांदेकर यांची मदत लाभतेच शिवाय आमचे केंद्र असलेल्या उकीडवे बिल्डिंगच्या रहिवाशांचेही सहकार्य असते.*: आनंद मेस्त्री* व्यवस्थापक, डॉ डी बी खानोलकर रूग्ण सेवा केंद्र


गरजूंची संख्या वाढत असल्यामुळे पर्यायाने साहित्य उपलब्ध नसल्यामुळे काही गरजूंना आम्ही साहित्य देऊ शकत नाही याची आम्हाला खंत वाटते. समाजाच्या मदतीवरच हे रुग्णसेवा केंद्र चालते. त्यामुळे दात्यांनी पुढे येऊन केंद्राला फाऊलर बेड, व्हील चेअर, वॉकर आदी साहित्याची मदत केल्यास सर्व गरजूंना या केंद्राची सेवा मिळेल. 

गेली पाच वर्षे कार्यरत असणारे हे डॉ. डी.बी. खानोलकर रूग्णसेवा केंद्र गोरगरीब रूग्णांच आधार बनलं आहे. कशाचीही अपेक्षा न ठेवता सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान व सदस्य रूग्णसेवेस परमेश्वराची सेवा केल्याच मानत २४×७ कार्यरत आहेत. रूग्णसेवेचा विचार जपत नव्या पिढीत हा विचार बिंबविण्यासाठी धडपडणाऱ्या सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या कार्याला मानाचा मुजरा !