डॉन्टस यांना अनोखी श्रद्धांजली | कर्मचारी पतसंस्थेचा कर्जावरील दर ०.१० टक्केने कमी

संस्थेच्या कार्यालयात डॉन्टस यांच्या प्रतिमेचे अनावरण
Edited by:
Published on: October 22, 2023 20:04 PM
views 154  views

सावंतवाडी : राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेचा मी जरी अध्यक्ष असलो तरी पी. एफ. डॉन्टस  यांचे कार्य जवळून पाहणारे तुम्ही सर्वजण आहात.  डॉन्टस हे सहकारातील ज्येष्ठ नेते होते.  त्यांचे सहकारातील अफाट   काम पाहता त्यांच्यासारखी सहकारत दुसरी व्यक्ती होणे नाही असे वाटते.   डॉन्टस यांना श्रद्धांजली म्हणून  १ नोव्हेंबर पासून सभासदांच्या  कर्ज व्याजाचा दर ०.१० टक्के  कमी करण्याचा निर्णय  आम्ही  घेत आहोत. असे संस्थेचे अध्यक्ष भाग्यवंत वाडीकर यांनी सांगितले.

   जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था, ओरोस या संस्थेचे संस्थापक  पी. एफ. डॉन्टस यांना  श्रद्धांजली वाहण्यासाठी आज संस्थेच्या सिंधुदुर्गनगरी येथील कार्यालयात शोकसभा आयोजित केली होती. यावेळी भाग्यवंत वाडेकर बोलत होते. यावेळी  आजी-माजी संचालक, सभासद, सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. 

 प्रथम  दोन मिनिटे स्तब्धता पाळून  डॉन्टस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉन्टस यांच्या प्रतिमेचे अनावरण संस्थेच्या कार्यालयात यावेळी करण्यात आले.

       यावेळी बोलताना माजी संचालक राजू तावडे म्हणाले, डॉन्टस, पी. व्ही. ठाकूर व त्यांच्या  सहकाऱ्यांनी फार कष्टातून ही संस्था उभी केलेली आहे.  हि  संस्था आज  प्रगतीपथावर  असून अशीच प्रगती सातत्याने व्हावी व  सभासदांना कमी व्याजदरात कर्ज मिळावे हीच डॉन्टस यांना  खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. 

 संघटना म्हणजे काय,  अधिकाऱ्यांसमोर कसे बोलावे, हे कर्मचाऱ्यांना शिकवणारे डॉन्टस हे पहिले नेते होते.  संघटना कशी चालवायची याचा गुरुमंत्र खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांनी दिला. आज आम्ही जे काय आहोत  त्याचे  सर्व श्रेय हे त्यांच्या चरणी अर्पण करतो. त्यांच्यामुळे या पतसंस्थेचा मी चेअरमन होऊ शकलो. असे उद्गार संस्थेचे माजी अध्यक्ष एस. एल. सकपाल यांनी यावेळी काढले.

 येणाऱ्या वार्षिक सभेत  ठराव घेऊन डॉन्टस  यांचे नाव संस्थेच्या सभागृहाला  द्यावे. अशी सूचना यावेळी संस्थेचे माजी चेअरमन आर. आर. सावंत यांनी केली. यावेळी यावेळी भाऊ पाताडे, शेखर पाडगावकर, सुभाष चौधरी, जी. व्ही. साळगावकर, नरसू रेडकर, श्रीमती आरती शेठ, नामदेव उर्फ दादा मठकर, जयप्रकाश जाधव, चंद्रकांत परब यांनी आपले मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष वासुदेव वरवडेकर , संचालक प्रकाश आडणेकर, दिनेश खवळे,प्रवीण सावंत, अमित गंगावणे, अनघा तळवडेकर, वर्षा मोहिते, राजेंद्र शिंगाडे, विलास चव्हाण, राजेश चव्हाण, वंदन गावडे, चेतन गोसावी,  बाळकृष्ण रणसिंग त्याचप्रमाणे  सुखानंद गवंडी, जे. जे.  खान, राजू सावंत,निळू मालवणकर, व्ही. के. परब, नाऱ्या कोठय्या, उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव निलेश कुडाळकर यांनी केले.