तारकर्ली समुद्रात बुडून एक पर्यटक बेपत्ता..!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 10, 2023 19:47 PM
views 607  views

मालवण : तारकर्ली एमटीडीसी समोरील समुद्रात बुडून एक पर्यटक बेपत्ता झाल्याची घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास  घडली. आदित्य पाटील (वय-२१) रा. बस्तवडे, ता. कागल जि. कोल्हापूर असे बेपत्ता पर्यटकाचे नाव आहे. यात तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे. समुद्रात बेपत्ता झालेल्या पर्यटकाचा स्थानिक मच्छीमार व स्कुबा डायव्हर यांच्या माध्यमातून उशिरापर्यंत शोध सुरू होता. 

सारथी सायबर क्लासेस मुरगुडचे वीस विद्यार्थी सहलीसाठी कुणकेश्वर येथे आले होते. कुणकेश्वर येथून सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान ते तारकर्ली एमटीडीसी येथील समुद्रावर पर्यटनाचा आनंद लुटण्यात आले. यातील आठ जण अंघोळीसाठी समुद्रात उतरले. यात पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य पाटील हा बुडून बेपत्ता झाला. त्याच्यासोबत असलेले अजिंक्य पाटील (वय-२१) रा. कविलगे ता. कागल, जि. कोल्हापूर, प्रसाद चौगुले, रितेश वायदंडे रा. कविलगे, ता. कागल, जि. कोल्हापूर हेही बुडू लागले. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच स्थानिकांनी समुद्रात धाव घेत या तिघांना किनाऱ्यावर आणले.

यातील अजिंक्य पाटील हा अत्यवस्थ बनल्याने त्याला १०८ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. स्वप्निल दळवी यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर, महादेव घागरे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.