म्हैस आडवी आली, गाडीवरचा ताबा सुटला ; युवकाचा जीव गेला

Edited by: दिपेश परब
Published on: August 13, 2025 14:35 PM
views 788  views

वेंगुर्ले : कुडाळ ते पाट गावाकडे जाणाऱ्या  रस्त्यावर मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास माडयाचीवाडी करमळगाळु एसटी स्टॉप नजीक भीषण अपघात झाला. रस्तावर अचानक म्हैस आडवी आल्याने इर्टिगा गाडी बाजू घेत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटून गाडी पलटी होत गटारामध्ये जाऊन अपघातग्रस्त झाली. या अपघातामध्ये १८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. अपघात प्रकरणी निवती पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोचरा येथील दत्ताराम राणे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, रात्री परुळे कुशेवाडा येथील चंद्रकांत सुरेंद्र परूळेकर वय ३२ हा एम एच ०७ ए जी ४९९५ या क्रमांकाची इर्टीगा गाडी घेऊन पाट च्या दिशेने येत होता. यावेळी गाडीत त्याच्या सोबत रोहन उर्फ अक्षय आत्माराम सावंत वय १८ हा होता. गाडी करमळगाळु एसटी स्टॉप नजीक आली असता समोर अचानक म्हैस आडवी आल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गाडीतील रोहन उर्फ अक्षय सावंत हा गंभीर जखमी होऊन जागेवरच मयत झाला.

दरम्यान या अपघात प्रकरणी स्वतःला किरकोळ दुखापत आणि रोहन याच्या मृत्यूस कारणीभूत धरून निवती पोलीस ठाण्यात चालक चंद्रकांत परूळेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहा. पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री. शेट्ये अधिक तपास करीत आहेत.