
रायगडः मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर सकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या खासगी बसला कंटेनरने धडक दिल्यामुळं हा अपघात घडला आहे. बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. या अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याच्या पहायला मिळत आहे. खोपोली परिसरात हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर ढेकू गावानजीकच्या उतारावर हा अपघात घडला आहे. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर बोरघाटात बसला भरधाव टेम्पोने मागून धडक दिल्याने बसचा मागचा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर बसच्या मागच्या बाजूला जोरात जाऊन धडकला. या अपघातात बसच्या मागच्या बाजूचा पूर्णपणे चुराडा झाला असून बस चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. ठोकर लागल्यामुळे बसचा चालक बसमधून बाहेर फेकला गेला व कंटेनर खाली आल्यामुळे मृत्युमुखी पडला. या बसमधून जवळपास ३७ हून अधिक प्रवाशी प्रवास करत होते. बसमधील तीन ते चार प्रवासी गंभीर जखमी आहेत. या प्रवाशांना एमजीएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहेत.
सिंधुदुर्ग येथे लग्नाला ही बस गेली होती. कोल्हापूरमार्गे वाशिंदला परतत असताना बसला अपघात झाला आहे. तर, कंटेनर हा कोल्हापूरहून वाशिंदला जात होता. जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर, १० ते १२ किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.