
मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे, आणि बांधकाम सल्लागार डॉ.चेतन पाटील यांच्यावर सदोष वधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक व अन्य गंभीर कलमां अतर्गत मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची तक्रार सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे सहाय्यक अभियंता अजित जनकराज पाटील यांनी दिली आहे. पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिल्या नंतर पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करा असे प्रशासनाला आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करत मालवण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी दिलेल्या तकारी नुसार, छत्रपती शिवाजी महाराज हे भारत देशाचे राष्ट्र पुरुष आहेत. राजकोट येथे उभारण्यात आलेल्या महाराजांच्या पुतळ्याची सुरक्षितता लक्षात घेवून हा पुतळा शतकानुशतके सुस्थितीत सुरक्षित व दिमाखाने उभा राहण्याच्या दृष्टीने परिपूर्ण व त्या संदर्भात आवश्यक अशी सर्वोतोपरी काळजी घेणे आवश्यक होते. परंतु शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणारे शिल्पकार व बांधकाम सल्लागार यांनी हा पुतळा कोसळला तर पुतळ्याच्या जवळील पर्यटक व इतर लोकांचे मृत्यू होईल तसेच अपरिमित जीवित व वित्त हानी होतील याची पूर्ण जाणीव असतानाही पुतळ्याच्या उभारणीकडे दुर्लक्ष केले.
या पुतळ्याच्या उभारणीचा अभ्यास न करता पुतळ्याची निकृष्ट दर्जाने उभारणी केली. तरी जयदीप आपटे व डॉ. चेतन पाटील यांनी एकमेकांच्या संगनमताने हे कृत्य केल्या प्रकरणी त्यांच्या वर मालवण पोलिसात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११०, १२५, ३१८, ३(५), ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.